पिंपरी (Pclive7.com):- मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या भाजपवर कडाडून टीका करत असताना, पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या महापौरांचं राज ठाकरेंवरील प्रेम दिसून आले. एका कार्यक्रमावेळी नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव चक्क राज ठाकरेंसमोर नतमस्तक झाले.
राज ठाकरे पिंपरी चिंचवडमध्ये एका खाजगी जिमचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी राहुल जाधव यांनी राज ठाकरेंच्या पाया पडून त्यांचा आशिर्वाद घेतला.
राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली, तेव्हा राहुल जाधव यांनी मनसेमध्ये प्रवेश करुन राजकारणात एन्ट्री केली होती. मनसेच्या तिकिटावर ते २०१२ साली पिंपरी महापालिकेत नगरसेवक म्हणून पहिल्यांदाच निवडून आले होते.
२०१७ साली भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर यंदा त्यांना महापौर होण्याचा मान मिळाला. महापौरपदाच्या निवडणुकीतही मनसेच्या एकमेव नगरसेवकाने जाधव यांनाच मत दिले होते. त्यामुळे जाधव यांच्या मनात मनसेविषयी अजूनही प्रेम असल्याचं या निमित्ताने दिसून आले होते.