पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे लुट-मार करणाऱ्या नेत्यांचे बगलबच्चे, ठेकेदार, अधिकारी, नगरसेवक यांच्या संगनमताने ‘रिंग’करून ३६० हून अधिक निविदा तब्बल ५४ कोटीची कामे रद्द करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे ‘देर आये दुरूस्त आये’ असं म्हणत सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर स्वागत केले आहे.
मारूती भापकर यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रक काढून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलयं की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विषयक व प्रभाग स्तरावरील कंत्राटी मिळविण्यासाठी ठेकेदारांनी र.रु ५४ कोटीच्या ३६० निविदा भरल्या होत्या. या चालू आर्थिक वर्षात मुख्यालयात आणि आठ प्रभाग कार्यालयांमार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात प्रामुख्याने काँक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक-रंगीत रबर मोल्डेड पेव्हिंग ब्लॉक बसविणे, स्टॉर्म वॉटर लाईन करणे, चर दुरुस्ती, रस्त्यांचे खडीकरण-मजबुतीकरण दुरुस्तीकाम करणे, पावसाळी गटर्स करणे, फुटपाथची दुरुस्ती, महापालिका मालकीच्या इमारतींची देखभाल-दुरुस्ती, रंगरंगोटी, नदी-घाट विकसित करणे, शौचालय बांधणे, उद्यान नुतनीकरण, स्ट्रीट फर्निचर बसविणे, आदी कामांचा यात समावेश होता. हि सर्व कामे १० लाख ते ४० लाखांच्या दरम्यानची होती.
या कामांच्या निविदा प्रक्रियेत अधिकारी, ठेकेदार, नगरसेवक यांनी संगनमत करत ‘रिंग’ करून निविदा भरल्या एकमेकांच्या संगणकावरून निविदा भरणे, एकाच खात्यातून इतर ठेकेदारांच्या अनामत रक्कमेचा ड्राफ्ट काढणे, प्रतिस्पर्धी ठेकेदाराचा पत्ता एकच असणे, किमान ३ निविदा आल्याचे भासवण्यासाठी बोगस निविदाकार उभा करणे, त्यासाठी त्याला कागदपत्र पुरविणे आदी गैरप्रकारांबरोबरच ठेकेदारांना दमदाटी करणे, इतर ठेकेदारांची कामे न करण्यासाठी नाडने, ठेका मिळालाच तर कामे रोखून धरणे, या प्रकारामुळे अधिकारी ठेकेदार संत्रस्त आहेत. ‘स्लीपिंग पार्टनरशिपच्या वाढत्या मागणीमुळे अनेक जुने ठेकेदार बेजार आहेत. आतातर अमुक-अमुक काम मी घेणार आहे त्याची निविदा कोणी भरू नये. असा धमकीचा संदेश व्हॉट्सअपवर आमदार पदाधिकाऱ्यांचे बगलबच्चे देतात. गेल्या दीड वर्षांत ठेका घेतल्यावरही विहित मुदतीत कामाचा पत्ता नाही. दर्जेदार कामाची हमी नाही, बिलासाठी मात्र तगादा लावला जातो. त्यामुळे अशा परिस्थितीमुळे ठेकेदार व अधिकारी तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत आहेत.
त्यामुळे निविदा प्रक्रियेत पारदर्शकता असावी म्हणून एकाच ‘आयपी अॅड्रेस’वरून भरलेल्या ३५० हून अधिक निविदा बाद केल्या आहेत. त्यामागे तांत्रिक कारणे शोधून गैरप्रकार होऊ नयेत, ठेकेदारांना चांगल्या सवयी लागाव्यात, शंकांना वाव राहु नये म्हणून वरील ३६० निविदा रद्द करून फेर निविदा मागविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच निविदांमध्ये निकोप स्पर्धा आणि गुणवत्ता पूर्ण कामे व्हावीत म्हणून महापालिकेच्या सर्व निविदा राज्य सरकारच्या महाटेंडर्स.जीओव्ही.इन या संकेत स्थळांवर उपलब्ध असतील असे आयुक्तांनी जाहीर केले. त्यांनी घेतलेल्या या ऐतेहासिक निर्णयाचे आम्ही स्वागत करीत असून आपण या घेतलेल्या धाडसी निर्णय बद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन असं भापकर यांनी म्हटलयं.
सन २०१७ पासून कचऱ्याची निविदा, रस्ते विकासाच्या र.रु ४२५ कोटीची निविदा, पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा, भक्तीशक्ती येथील उड्डाणपूल निविदा, ताडपत्रे खरेदी, बहिरवाडे व वाकड येथील सीमा भिंत आदी. प्रकरणांबाबत गेले दीड वर्ष आयुक्तांना तक्रारी करत असताना त्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. गेले दीड वर्षे येथील पदाधिकारी व त्यांच्या बगल बच्चांनी लूटमारीचा कहर केला. तरी देखील “देर आये पर दुरुस्त आये” या म्हणी प्रमाणे आपण या निविदा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. अशाच प्रकारचे जनहिताचे व धाडसी निर्णय आपण घ्यावेत. त्यामुळे शहरातील सर्व क्षेत्रातील विवेकी नागरिक आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असं भापकर यांनी म्हटलयं.






















Join Our Whatsapp Group