पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात ‘स्वाईन फ्लू’चा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज पुन्हा दोन रूग्णांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला आहे. त्यामुळे शहरात स्वाईन फ्लूने मृत झालेल्यांची संख्या १३ वर पोहचली आहे. दरम्यान शहरातील विविध रूग्णालयात स्वाईन फ्लूच्या बाधित तब्बल २५ रूग्णांवर उपचार सुरू असून ४ रूग्ण अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहेत.
थेरगाव येथील एका खाजगी रूग्णालयात माण येथील ७२ वर्षीय वृध्द महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. तर मलकापूर, बुलढाणा येथील ६० वर्षीय वृध्दाचा पिंपरीतील खाजगी रूग्णालयाय आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या २० दिवसांत पिंपरी चिंचवडमध्ये ‘स्वाईन फ्लू’ने तब्बल १३ बळी घेतले असून सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने आपला विळखा चांगलाच आवळला आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळे स्वाईन फ्लूचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन शहरवासियांना करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group