– आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
– शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांची माहिती
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत शिक्षकांना अखेर धन्वंतरी योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंजूर केला आहे. गेल्या २५ वर्षांपासून शिक्षकांची ही मागणी मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. विशेष म्हणजे, सेवानिवृत्त शिक्षकांनाही या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.
भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात १४ ऑक्टोबर २०१८ रोजी शिक्षक मेळावा घेतला. त्यावेळी शहरातील शासकीय आणि निमशासकीय तसेच खासगी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यावेळी संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार महेश लांडगे यांना ‘धन्वंतरी’ योजना लागू करण्याबाबत सांकडे घातले होते. महापालिका प्रशासनाकडे प्रलंबित असलेला हा विषय लवकरात लवकर मार्गी लावला जाईल, असे आश्वासन आमदार लांडगे यांनी शिक्षकांना दिले होते. दरम्यान, आमदार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील सेवेतील, तसेच सेवानिवृत्त शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वैद्यकीय उपचारांसाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना लागू करण्याची शिफारस प्रशासनाकडे करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांना धन्वंतरी योजना लागू केली होती. मात्र, शिक्षकांना या योजनेतून वगळण्यात आले होते. सुमारे ११०० शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे शिक्षकांना आरोग्य वीमा योजनेचे सर्व फायदे मिळणार आहेत, अशी माहिती पदविधर प्राथमिक शिक्षक संघटनेचे सचिव हरिष चौधरी यांनी दिली.
अध्यक्ष मनोज मराठे म्हणाले की, शिक्षकांना धन्वंतरी योजनेचा लाभ सर्व शिक्षकांना मिळावा, अशी मागणी आम्ही भोसरीतील शिक्षक मेळाव्यात केली होती. त्यावेळी आमदार महेश लांडगे यांनी आम्हाला आश्वासन दिले होते. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांनी पुढाकार घेतला. शहरातील सर्व शिक्षकांच्या दृष्टीने हा अत्यंत दिलासादायक निर्णय झाला आहे.
शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे म्हणाल्या की, शहर आणि परिसरातील तब्बल ९८ रुग्णालयांचा समावेश धन्वंतरी स्वास्थ योजनेमध्ये आहे. महापालिका प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, शिक्षकांना त्यातून वगळण्यात आले होते. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आम्ही त्याबाबत प्रशासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला. त्याद्वारे आमदार लांडगे यांनी शिक्षकांना दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे.