पिंपरी (Pclive7.com):- तिकीटदरावरील जीएसटीत कपात करण्यात आली असल्यामुळे मल्टिफ्लेक्सचे तिकीटदर कमी करण्यात यावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. शिवसेनेचे पिंपरी विधानसभा शहर संघटक जितेंद्र ननावरे यांनी याबाबत चिंचवडच्या कार्निव्हल सिनेमागृहाच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने १ जानेवारी २०१९ रोजी पारित केलेल्या अधिसूचनेनुसार मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहातील तिकीटदरांवरील जीएसटीमध्ये कपात करण्यात आली आहे. पूर्वी १०० रुपयांच्या आतील तिकीट दराला १८ टक्के व १०० रुपयांवरील तिकिटाला २८ टक्के जीएसटी असा दर होता. मात्र १ जानेवारीपासून त्यामध्ये शासनाने कपात केली आहे. शासनाने पारित केलेल्या अधिसूचनेनुसार १००रुपयांच्या आतील तिकीट दराला १२ टक्के जीएसटी व १०० रुपयांच्या वरील तिकिटाला १८ टक्के असे दर करण्यात आलेले आहेत. या शासनाच्या अधिसूचनेनुसार चित्रपटगृह चालकांनी तिकीटदर कमी केले नाहीत. सध्या पूर्वीप्रमाणेच तिकीटदर ‘जैसे थे’ ठेवून नागरिकांची व शासनाची फसवणूक चित्रपटगृहचालक करीत आहेत. मागील आठवड्यातील शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशीचे दर व आजचे दर जवळपास सारखेच आहेत. इतर चित्रपट गृहानी दर कमी केलेले असतांना कार्निव्हल सिनेमा व्यवस्थापन या विषयाबाबतीत गंभीर दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या या अडमुठपणाच्या धोरणामुळे नागरिकांच्या मनामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तरी कार्निव्हल सिनेमा व्यवस्थापनाने तिकिटाचे दर इतर चित्रपट गृहाप्रमाने कमी केले नाहीत तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा जितेंद्र ननावरे यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group