पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित पहिल्या ‘पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग’ (पीसीपीएल) महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेची दमदार सुरुवात झाली. हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उद्घाटनाच्या दिवशी ऐश्वर्यम चॅलेंजर्स आणि नायर ईगल्स या संघांनी प्रभावी विजय नोंदवत आपली ताकद दाखवून दिली.

पहिल्या सामन्यात सहेज कौर हिच्या नाबाद ५१ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर ऐश्वर्यम चॅलेंजर्स संघाने बन्ट वॉरियर्सवर ७ गडी राखून सहज विजय मिळवला. बन्ट वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऐश्वर्यम चॅलेंजर्सने १८ षटकांतच लक्ष्य गाठले. सहेज कौर आणि नीती अगरवाल (४७ धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ९९ धावांची भक्कम भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला. सहेज कौर हिला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले, तर ऋतुजा गिलबिले हिला ‘फायटर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला.

दुसऱ्या सामन्यात इशा घुले हिने केलेल्या ८७ धावांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर नायर ईगल्स संघाने ऑक्सिरीच संघावर १९ धावांनी मात केली. नायर ईगल्सने प्रथम फलंदाजी करत १५९ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात ऑक्सिरीच संघ १४० धावांपर्यंत मजल मारू शकला. इशा घुले हिला सामनावीर, तर स्वांजली मुळे हिला ‘फायटर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार उमा खापरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक संचयाना कुमार दास, सहसचिव दिलीपसिंह मोहिते, खजिनदार संजय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार उमा खापरे यांनी महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. या स्पर्धेतून अनेक गुणवान महिला खेळाडू पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सचिव राजू कोतवाल यांनीही शहरात क्रिकेटचा विकास आणि नवोदितांना संधी देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या रंगतदार सामन्यांमुळे प्रेक्षकांना क्रिकेटचा रोमांचक अनुभव मिळाला असून पुढील सामनेही तितकेच उत्साहवर्धक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





















Join Our Whatsapp Group