पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी उपमहापौर तथा नगरसेवक डब्बू आसवानी यांनी पुढाकार घेत महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. या भेटीत शहराच्या विकासासंदर्भात तब्बल १८ महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या बैठकीत पिंपरी मार्केट परिसरातील पार्किंगच्या समस्येवर उपाय म्हणून मल्टीलेव्हल पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच साई चौक, शगुन चौक, डिलक्स चौक, जमतानी चौक, त्रिलोक स्मशानभूमी चौक आणि भाटनगर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम वेळेत पूर्ण करून त्या पुलाला ‘लोकनेते दिवंगत अजितदादा पवार साहेब उड्डाणपूल’ असे नाव देण्याचाही प्रस्ताव आसवानी यांनी मांडला.

स्वच्छता आणि आरोग्य विषयावर बोलताना कचरा संकलनातील त्रुटी आणि प्रभाग क्रमांक २१ मधील आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. तसेच पिंपरी म्हाडा परिसरात २० लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारणे, बुस्टर पंप बसवणे आणि सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबतही चर्चा झाली.

नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले वेळेत मिळावेत, उद्यानांची देखभाल सुधारावी, खेळाची मैदाने विकसित करावीत, तसेच शहरातील बेघर नागरिक आणि लावारिस वाहनांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी गटार, नाले आणि ड्रेनेज लाईनची आधुनिक पद्धतीने स्वच्छता करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
या सकारात्मक चर्चेमुळे पिंपरीतील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, नागरिकांसाठी हा पाठपुरावा दिलासादायक ठरणार आहे. या बैठकीस नगरसेविका निकिता कदम, प्रियांका कुदळे तसेच महापालिका अधिकारी आणि संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group