पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने भव्य ‘मोफत विमा नोंदणी अभियान’ राबवण्यात आले. शहरातील मुख्य पक्ष कार्यालयात पार पडलेल्या या उपक्रमाला नागरिकांसह पक्ष पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी कार्य करण्याचा संदेश देत हा उपक्रम आयोजित करण्यात आला. केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या अभियानामागील मुख्य उद्देश होता.

या शिबिरामध्ये शहरातील शेकडो नागरिक, युवक आणि पक्ष पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवून लाभ घेतला. तज्ज्ञ प्रतिनिधींमार्फत विमा अर्जांची मोफत नोंदणी तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली.

या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना अपघाती विमा तसेच विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले की, “शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा नेहमीच कल रचनात्मक आणि समाजोपयोगी उपक्रमांकडे असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना सुरक्षिततेचे कवच मिळावे, या उद्देशाने युवा मोर्चाने हा उपक्रम हाती घेतला आहे.”





















Join Our Whatsapp Group