पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील दोन डॉक्टरांना वैद्यकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा दोषारोप सिद्ध झाल्याने डॉक्टरांवर ही कारवाई करण्यात आली आहे. डॉ. श्रीराम तुळशीराम भंडारे आणि डॉ. राजीव शामराव शहारे या दोन डॉक्टरांची महापालिका प्रशासनाकडे असलेली एक लाख रुपयांची बँक गॅरेंटीदेखील जप्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी दिले आहेत.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये आठ रुग्णालये आणि २७ दवाखाने कार्यरत आहेत. त्यापैकी ‘वायसीएम’ हे बहुविध शाखांचे आणि ७५० खाटांच्या क्षमतेचे सर्वात मोठे रुग्णालय आहे. महापालिका हद्दीबरोबरच नजीकच्या ग्रामीण भागातील रुग्णदेखील येथे उपचारांसाठी येत असतात. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या वैद्यकीय सेवेतील सर्व कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी २४ तास कर्तव्यास बांधिल आहेत.
दरम्यान, २१ मार्च २०१६ रोजी ‘वायसीएम’मध्ये तीन मृतदेह विच्छेदनासाठी आले होते. मात्र शवविच्छेदन विभागाचे डॉ. शिंगे हे अनुपस्थित होते. तर डॉ. भंडारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी त्यांचा भ्रमणध्वनी बंद करून ठेवल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांना या मृतदेहांचे विच्छेदन करावे लागले. याशिवाय २७ एप्रिल २०१६ रोजी शवविच्छेदनासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीची पूर्वसूचना देऊनही हे दोन्ही अधिकारी अनुपस्थित राहिले. या दोन्ही डॉक्टरांनी नेमून दिलेल्या कर्तव्यात नितांत सचोटी न राखता, हेतुपुरस्परपणे केलेला हलगर्जीपणा व बेजबाबदार वर्तणुकीबाबत त्यांना सेवानिलंबित करुन, त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते; मात्र शवविच्छेदन गृहातील अत्यंत संवेदनशील कामकाज व वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन, त्यांचे सेवानिलंबन रद्द करून, त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू ठेवली होती.
चौकशीअंती आयुक्त हर्डीकर यांना प्राप्त झालेल्या अहवालात या दोन्ही डॉक्टरांवरील दोषारोप शाबित झाले. तसेच डॉ. भंडारे यांनी त्यांच्यावरील दोषारोप मान्यदेखील केले. याशिवाय डॉ. भंडारे हे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करीत असून, विनापरवानगी गैरहजेरी लक्षात घेता, ते कर्तव्यावर रुजू होण्याची शक्यता नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. या दोन्ही डॉक्टरांना बचावासाठी अंतिम ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. त्याचा महापालिका प्रशासनाला अद्यापही खुलासा प्राप्त झालेला नाही.
या दोन्ही डॉक्टरांबाबत वैद्यकीय विभागप्रमुखांनी सादर केलेल्या खुलाशावरून, या दोन्ही डॉक्टरांना वैद्यकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहेत. याशिवाय या दोन्ही डॉक्टरांची एक लाख रुपयांची बँक गॅरेंटीदेखील जप्त करण्याचे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी दिले आहेत.