पिंपरी (Pclive7.com):- औद्योगिक क्रीडा संघटनेची सर्वसाधारण सभा शुक्रवार, दिनांक ५ जुलै २०२४ रोजी पीवायसी हॉल, पुणे येथे सायंकाळी ७ वाजता संपन्न झाली. या सभेला तळेगाव, चाकण, पिंपरी-चिंचवड, पुणे येथील कामगार क्षेत्रातील विविध कंपन्यांचे खेळाडू व प्रतिनिधी उपस्थित होते.
या सभेस क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर रघुनाथ जठार, आंतरराष्ट्रीय धावपटू रमेश तावडे, महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ, टाटा मोटर्सचे माजी स्पोर्ट्स ऑफिसर व फुटबॉलपटू आर.के.जयराजन, किर्लोस्कर कमिंस इंडियाचे माजी व्हाईस चेअरमन (एचआर) उल्हास चंद्रात्रे व संघटनेचे अध्यक्ष गोल्फ खेळाडू राजेंद्र नागेशकर उपस्थित होते.
या पारितोषक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन नरेंद्र कदम, प्रास्ताविक वसंत ठोंबरे यांनी केले. संघटनेच्या प्रगतीचा आढावाचे वाचन हरि देशपांडे यांनी केले. आर्थिक अहवाल वाचन प्रदीप वाघ यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे सत्कार पुष्पगुच्छ देऊन विजय हिंगे, बालाजी नानिवडेकर यांनी केले. या सर्व समारंभाचे आयोजन प्रदीप वाघ, नरेंद्र कदम, वसंत ठोंबरे, हरी देशपांडे, बालाजी नानिवडेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन विजय हिंगे यांनी केले.
२०२३–२४ वर्षाच्या काळात झालेल्या स्पर्धांमध्ये टाटा मोटर्सने ६० गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपद तर बजाज ऑटो आकुर्डी संघाने ४० गुण मिळवून उपविजेतेपद पटकावले. टाटा मोटर्सकडून टाटा मोटर्स स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष शशिकांत कात्रे व युनियन प्रतिनिधी रितेश पिसाळ तर बजाज ऑटोकडून उपविजेतेपदाचा करंडक सोमनाथ यांनी ब्रिगेडियर जठार यांच्याकडून स्वीकारला. व याच समारंभ प्रसंगी संस्थेचे २०२४–२५ चे क्रीडा वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना उल्हास चंद्रात्रे म्हणाले की, “क्रीडाप्रेमी उद्योजक व खेळाडू” यांच्या कष्टावर संघटनेने ६० वर्षे पूर्ण केली आहेत. याचा मला खूप आनंद होतो. रमेश तावडे यांनी सांगितले की विविध कंपन्यांना एकत्र आणून पुण्यातील कामगारांना आपले क्रीडा नैपुण्य दाखवण्यासाठी ही संघटना स्थापन झाली. याचा फायदा सगळ्यांना होत आहे. मिलिंद गुंजाळ यांनी स्पष्ट केले की औद्योगिक क्रीडा संघटनेची परंपरा फार मोठी आहे. या संघटनेच्या स्पर्धांची प्रतीक्षा कामगारांकडून केली जाते. तिच्याबद्दल खूप उत्सुकता असते. वर्षभर सराव, कष्ट करून आपले क्रीडा नैपुण्य दाखवण्याची संधी या संघटनेच्या स्पर्धांमधून मिळते.
प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर जठार म्हणाले की, औद्योगिक क्रीडा संघटना अधिक चांगले काम करत आहे. तिचे कार्य विस्तारत आहे याचा मला खूप आनंद होत आहे. तर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर म्हणाले की, २०२३–२४ मध्ये संघटनेच्या स्पर्धांमध्ये जवळजवळ १५० कंपन्यांनी, २१०० च्यावर खेळाडूंनी, १४ खेळाच्या स्पर्धामधून आपला सहभाग नोंदवला. तसेच महिला खेळाडूंचा या स्पर्धांमध्ये मोठा सहभाग आहे ही बाब उल्लेखनीय आहे. औद्योगिक क्रीडा संघटना अजून चांगल्या प्रकारे स्पर्धेचे आयोजन करणार याचा मला विश्वास वाटतो.
यास प्रसंगी स्पर्धेत प्रायोजकत्व देणाऱ्या दहा कंपन्यांना (सँडविक एशिया, टाटा मोटर्स, बजाज ऑटो आकुर्डी, फॉरविया फॉरेशिया, एसकेएफ, प्राज इंडस्ट्रीज, ॲटलास कॉपको, अल्ट्रा कार्पोटेक, महेंद्रा अँड महिंद्रा, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स) सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर संस्थेस स्थापनेपासून आपले योगदान देणारे जेष्ठ व वरिष्ठ सदस्य रमेश तावडे,पी.व्ही.लेले, ब्रिगेडियर रघुनाथ जठार, अजित कुलकर्णी, बाप्टीस्ट डिसूजा, उल्हास चंद्रात्रे, जयराजन आर के, किसन गायकवाड, मिलिंद गुंजाळ यांच्या घरी जाऊन अभिष्टचिंतन व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. याबद्दल या सदस्यांनी आपला आनंद व्यक्त केला. याप्रसंगी सभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व खेळाडू व क्रीडा प्रतिनिधींनी संघटनेच्या ज्येष्ठ व वरिष्ठ सदस्यांनी समर्पित भावनेने, वचनबद्धतेने, कष्टाने केलेल्या कामाबद्दल ऋण व्यक्त केले.