पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे ब्रीदवाक्य “कटिबद्ध जनहिताय” असे आहे. पालिकेकडून गोरगरीब व गरजू नागरिकांना अल्पदरात व मोफत वैद्यकीय सेवा पुरविणे बंधनकारक आहे. मात्र भोसरीतील रूग्णालयाचे खाजगीकरणाचा घाट घालून ‘कटिबद्ध जनलुटाय’ असं ब्रीदवाक्य सत्ताधारी भाजपाने केले. भोसरी रुग्णालय खासगीकरण करण्याचा विषय रद्द करण्यात यावा अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल असा इशारा शिवसेना पिंपरी विधानसभा संघटक जितेंद्र ननावरे यांनी दिला आहे. या बाबतचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ४ फेब्रुवारी २०१९ रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अवघ्या १५ मिनिटांमध्ये कोणतीही चर्चा न करता भोसरी रुग्णालय खाजगी संस्थेस चालविण्यास देणेबाबत प्रस्ताव प्रचंड गदारोळात मंजूर करण्यात आला. या विषयामुळे पिंपरी चिंचवडच्या जनतेमध्ये महापालिकेच्या कार्यशैलीबाबत संशय निर्माण झाला असून पूर्ण असंतोष पसरला आहे.
यशवंतराव चव्हाण रूग्णालयात हजारो रुग्ण उपचार घेत असून या रूग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी व महापालिका हद्दीतील लोकसंख्या वाढीचा विचार करता महापालिकेने उपरुग्णालयाचा विस्तार करणे या अंतर्गत भोसरी रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला व २२ कोटी रुपये खर्च करून रुग्णालय बांधण्यात आले.
महापालिकेचे ब्रीदवाक्य “कटिबद्ध जनहिताय” असे आहे. महापालिकेकडून गोरगरीब व गरजू नागरिकांना अल्पदरात व मोफत वैद्यकीय सेवा पुरविणे बंधनकारक आहे. त्या अंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून भोसरी रुग्णालय बांधण्यात आले. पण हे रुग्णालय बांधल्यानंतर अचानकपणे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना साक्षात्कार झाला की आपण हे रुग्णालय चालवू शकत नाही. हे रुग्णालय बांधण्याच्या अगोदर हे कळले नाही का? अधिकारी पूर्ण २२ कोटी खर्च होईपर्यंत गप्प का? बसले होते.
या अगोदर वाय.सी.एम रुग्णालयात भागीदारी तत्वावर रुबी ऐल्केअर सारखे सेंटर आपण त्यांना एक रुपया ही न देता रुग्णांना महापालिकेने ठरविलेल्या अल्पदरामध्ये सेवा पुरवत आहे. वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी महापालिकेला अंदाजे १७ कोटी रु. वार्षिक खर्च व ७ व्या वेतन आयोगानंतर ३ कोटी इतक्या रकमेची वाढ गृहीत धरून आणि रुग्णालय चालविणाऱ्या संस्थेला मिळणारे उत्पन्न याच्यातील दर फरक तत्वानुसार निविदा काढून खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला आहे.
सदर प्रस्ताव अतिशय चुकीच्या पद्धतीने सभागृहासमोर सादर केलेला आहे. यामध्ये नागरिक कोणताही असो महापालिकेने रुग्णसेवा अल्पदरात पुरविणे बंधनकारक असताना या रुग्णालयाचे खाजगीकरण करून महापालिकेच्या ब्रीदवाक्यालाच हरताळ फासण्याचा प्रकार आपल्याकडून झालेला आहे. महापालिका आयुक्त साहेब आपण करदात्याच्या पैशाची लूट करण्याचा मार्ग खाजगीकरणाच्या माध्यमातून खुला करून महापालिकेचे ब्रीदवाक्य “कटिबद्ध जनलुटाय”असे केले आहे.
सदर विषयामध्ये महापालिकेने रुग्णालय चालविल्यास भोसरी भागातील गरीब व गरजू लोकांना १०० टक्के रुग्णसेवा मिळणार असल्याने भोसरी विभागातील नामांकीत डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत. सत्ताधाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्या दबावाला बळी पडून आपण आपल्या सभागृहात हा प्रस्ताव आणून सत्ताधाऱ्यांकडून मंजूर करून घेतला आहे.
सदर रुग्णालय खाजगीकरण करणे अगोदरच १ कोटीचे साहित्य आपण खरेदी करून ठेवलेले आहे. म्हणजे एक प्रकारे खाजगी संस्थेला करदात्याच्या पैशाची लूट करून देणे हाच प्रकार असल्याचे दिसून येतो. आपण अंदाजे २० कोटी खर्च होणार आहे. असा अहवाल कोणी दिला आणि कोणत्या अधिकाऱ्याला आपण हे रुग्णालय चालू शकत नाही याचा साक्षात्कार झाला त्या अधिकाऱ्याचे नाव जाहीर करावे. व सदर अधिकाऱ्याचा यात सहभाग काय हे पाहून आपण त्याच्यावर कारवाई करावी.
या खासगीकरणामुळे महापालिकेच्या सर्व सामान्य करदात्यांची लूट होणार असून महापालिकेच्या ध्येय धोरणाला हरताळ फासला जाणार आहे. महापालिकेला शहराचा विकास दर वाढवायचा आहे का? महापलिकेतल्या अधिकारी राज्यकर्ते व खाजगी संस्थाचा विकास दर वाढवायचा आहे ? हा प्रश्न महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना पडला आहे. त्यामुळे हा खाजगीकरण करण्याचा प्रशासनाने जो घाट घातला आहे. हा प्रस्ताव आपण तातडीने मागे घेऊन महापालिकेकडूनच हे रुग्णालय चालवावे या बाबतीत आपण तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल असा इशारा शिवसेना पिंपरी विधानसभा संघटक जितेंद्र ननावरे यांनी दिला आहे.





















Join Our Whatsapp Group