आरती चोंधे, झामाबाई बारणे, शीतल शिंदे, संतोष लोंढे यांची नावे चर्चेत
पिंपरी (Pclive7.com):- श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याचा फैसला शनिवारी (दि.२ मार्च ) रोजी होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शनिवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज करायचे आहेत. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर लगेच अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावर शिक्कामोर्तब होणार असून अध्यक्षपदाची प्रत्यक्ष निवडणूक गुरुवारी (दि.७) दुपारी १२ वाजता होणार आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत असून आरती चोंधे, झामाबाई बारणे, शीतल शिंदे आणि संतोष लोंढे यांच्यात अध्यक्षपदासाठी चूरस निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्य असतात. भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. दोन वर्षाच्या कार्यकाळ संपलेल्या सदस्यांची जागी शुक्रवारी (दि.२२) भाजपच्या शीतल शिंदे, आरती चोंधे, संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर, मयूर कलाटे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांची समितीत निवड करण्यात आली.
स्थायी समितीत दहा भाजप, चार राष्ट्रवादी काँग्रेस, एक शिवसेना आणि एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. अपक्ष सदस्य भाजपसोबत आहेत. भाजपचे स्थायीत बहुमत असल्याने भाजपचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे. अध्यक्षपदासाठी आरती चोंधे, झामाबाई बारणे, शीतल शिंदे आणि संतोष लोंढे यांच्यात अध्यक्षपदासाठी चूरस निर्माण झाली आहे.
संतोष लोंढे यांना सभापतीपद देण्याची मागणी महापौर राहुल जाधव यांच्यासह भोसरीतील नगरसेवकांनी केली आहे. तर, शीतल शिंदे यांच्या नावाला राज्य नेतृत्वाचा ‘हिरवा’ कंदील असल्याचे बोलले जात आहे. तर, ऐनवेळी आरती चोंधे किंवा झामाबाई बारणे यांचे नाव पुढे येऊ शकते. त्यामुळे पक्ष नेमके या तिघांपैकी स्थायीचे अध्यक्षपद कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळासह शहराचे लक्ष लागले आहे.
पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार शनिवारी (दि.२) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. ७ मार्च रोजी दुपारी बारा वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृषी आयुक्त सुहास दिवसे कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.