पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १८ मजली पर्यावरणपूरक नवीन प्रशासकीय इमारतीच्या पायाभरणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते आणखी दीड वर्षे चालणार आहे. त्यानंतर सर्व विभागांना पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे. वीस टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती सहशहर अभियंता प्रमोद ओंबासे यांनी दिली.

पिंपरी येथील महापालिकेची सध्याची चार मजली इमारत अपुरी पडत आहे. अनेक विभागांना इमारतीमध्ये जागाच उपलब्ध नसल्याने इतर कार्यालयात कामे सुरू आहेत. अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपुऱ्या जागेत कामे करावी लागत आहेत. त्यामुळे चिंचवड येथील सायन्स पार्क समोर डी मार्ट शेजारी असलेल्या महापालिकेच्या ८.६५ एकर जागेत नव्या इमारतीचे काम १३ जानेवारी २०२३ ला सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी २८६ कोटी ८४ लाख इतका खर्च अपेक्षित आहे.
हैदराबादच्या केएमव्ही प्रोजेक्ट लिमिटेड या ठेकेदार कंपनीमार्फत काम सुरू आहे. येथे अठरा इमारतींचे दोन विंग आणि सहा मजली इमारतीचे दोन विंग असणार आहेत. एकूण ९१ हजार ४५९ चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. खडक असल्याने स्फोट करून खोदकाम करावे लागले. हे काम अनेक महिने सुरू होते. आता पायाभरणीचे काम झाले आहे.
या इमारतीमध्ये महापालिका सर्वसाधारण सभागृह, सुसज्ज ग्रंथालय, प्रदर्शन दालन, बहुउद्देशीय सभागृह, नागरिक व कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणीसाठी क्लिनिक, एटीएम सेंटर, इ-गव्हर्नन्स, नागरी सुविधा केंद्र, सुरक्षा कक्ष, कोर्ट यार्ड, स्वच्छतागृह, स्वागत आणि माहिती कक्ष, कॅन्टीन व पत्रकार कक्ष आदींचा समावेश करण्यात आला आहे.
सद्यस्थितीत २० टक्के काम पूर्ण झाले असून इमारतीचे संपूर्ण खोदकाम व फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. आता सर्वात खालील तळघराच्या स्लॅबचे काम प्रगतिपथावर आहे. स्लॅब वरील कॉलमचे काम पावसाळ्यात करणे शक्य होणार आहे. मुदतीमध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.– प्रमोद ओंबासे, सहशहर अभियंता, प्रकल्प विभाग






















Join Our Whatsapp Group