भोसरी (Pclive7.com):- शिरूर लोकसभेचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे ‘टेंन्शन’ अखेर दूर झाले आहे. भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांची ‘मनधरणी’ करण्यात आढळरावांना यश आले आहे. आज आढळरावांनी भोसरीतील आमदार लांडगेंच्या कार्यालयास भेट देऊन चर्चा केली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये ‘दिलजमाई’ झाली असून आढळरावांच्या प्रचारात आता आमदार लांडगे सक्रीय सहभागी घेणार आहेत.
शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्यात कमालीचा संघर्ष गेल्या पाच वर्षात पहायला मिळाला. महेश लांडगे यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कामात आढळराव आणि त्यांच्या समर्थकांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या. मोशी कचरा डेपोचा प्रश्न असो की वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प खासदारांनी प्रत्येकवेळेस महेश लांडगेंवर निशाना साधला होता. म्हणूनच आमदार लांडगे यांनी थेट दंड थोपटत शिरूरच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली होती. त्यामुळे आढळरावांचे ‘धाबे’ चांगलेच दणाणले होते. परंतू आता शिवसेना, भाजप युती झाल्यामुळे कट्टर विरोधकांना एकत्र यावे लागले आहे. कारण लांडगे प्रचारात सक्रीय होत नसल्यामुळे आढळरावांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. म्हणूनच त्यांनी ‘बँकफूट’वर जात महेश लांडगे यांची ‘मनधरणी’ केली आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या प्रमुख समर्थकांसह आज भोसरीतील आमदार लांडगे यांच्या कार्यालयात युतीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, शरद सोनवणे, महापौर राहुल जाधव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, तसेच आमदार लांडगे समर्थक नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, झालं गेलं विसरून जावा.. आता एकत्र काम करू.. जे काही भाजपा, महेश लांडगे यांच्या विरोधात आरोप केले असतील, चौकश्या लावल्या असतील ते मागे घेणार असल्याचे सांगत प्रचारात भाजपच्या सर्वांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच विराजमान करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. युतीचा ‘धर्म’ आम्ही पाळणार आहोत. निवडणुकीत युतीचाच प्रचार आम्ही करणार आहोत. भोसरी मतदारसंघातून आढळरावांना प्रचंड मतांची आघाडी घेऊन देऊ. परंतू आढळरावांनी पुढेही युतीचा ‘धर्म’ पाळला पाहिजे.