पुणे (Pclive7.com):- पुणे लोकसभेचे भाजपा, शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार गिरीश बापट यांनी आज मोठ्या शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. कसबा गणपतीचे सकाळी दर्शन घेऊन रँलीव्दारे बापट यांनी त्यांचा अर्ज दाखल केला.
यावेळी गिरीश बापट यांच्या सोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, शिवसेना उपनेत्या निलमताई गोऱ्हे, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे, भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे, आरपीआय शहर अध्यक्ष अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा, शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गिरीश बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी गेली ४५ वर्ष शहराचे नेतृत्व करत आहे. या काळात मी जितक्या निवडणुका लढल्या त्यातील कुठलीच निवडणूक मला अवघड वाटली नाही. मी जितक्या दृढ निश्चयाने महापालिकेत प्रवेश केला, तितक्याच आत्मविश्वासाने आमदार आणि मंत्री म्हणून मी विधानसभेत प्रवेश केला. आणि आता त्याच दृढनिश्चयाने लोकसभेत जाणार आहे. कार्यकर्ता ही माझी ताकद आहे. या कार्यकर्त्यांच्या जीवावर मी एवढे यश प्राप्त केले आहे. राजकीय जीवनात आजवर कोणाला शत्रू मानले नाही. सर्व पक्षातील नेत्यांशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे ही लढाई मैत्रीपूर्ण होईल असा मला विश्वास आहे. या निवडणुकीच्या प्रचारात कोणावरही वैयक्तिक टिका – टिप्पणी करून प्रचाराची पातळी घसरू देणार नाही. आजवर केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुकीत मतं मागणार आहे.