पिंपरी (Pclive7.com):- पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शाळा उद्या शुक्रवार (दि.२६) रोजी बंद ठेवण्याची आदेश दिले आहेत.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240724-WA0042-300x300.jpg)
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २५ जुलै व २६ जुलै २०२४ रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा २६ जुलै २०२४ रोजी बंद ठेवणे आवश्यक आहे.
तसेच खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे या सर्व बाबींचा विचार करता भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहिर करणे आवश्यक आहे.
त्यानुसार भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्याना दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहिर करीत असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी म्हटले आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240624-WA00001-300x300.jpg)