पिंपरी (Pclive7.com):- अखिल पिंपरी चिंचवड शिवजयंती महोत्सव समन्वय समितीची बैठक रविवारी (दि. २१) रोजी पार पडली. दि. २३ मार्च रोजी तिथीनुसार एक गाव एक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, याचा आढावा बैठक चैतन्य सभागृह, चिंचवड येथे घेण्यात आली होती. या बैठकीत पिंपरी चिंचवड शहरातील एक गाव एक शिवजयंती महोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला दि.२९ एप्रिलला होणाऱ्या मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना १०० टक्के मतदान करा, नोटाचा वापर न करता देश हितासाठी मतदान करा आणि १०० टक्के मतदान होण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
देशात देशांतर्गत शहरी नक्षलवाद व माओवाद प्रचंड प्रमाणात सोकावतो आहे. नक्षलवादामुळे देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शहरी नक्षलवादाचे आव्हान याविषयावर माजी सैन्याधिकारी, नक्षलवाद विषयाच्या अभ्यासिका कॅप्टन स्मिता गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शहरी नक्षलवाद व त्याचे परिणाम या विषयावर उपस्थितांना कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन कुणाल साठे यांनी केले होते. या कार्यक्रमास नितीन वाटकर, शिवचरित्र कथाकार सचिन ढोबळे, अभिजित शिंदे, मुकुंद चव्हाण, शार्दुल पेडरकर व पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
मावळ लोकसभा मतदार संघात नोटाचा वापर न करता देश हितासाठी १०० टक्के मतदान करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन मतदान करणार असे आश्वासन दिले.