पिंपरी (Pclive7.com):- आमदार नितेश राणेंनी अभियंत्याला पुलाला बांधून चिखलाची अंघोळ घातली. त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेचा शिवसेना पिंपरी-चिंचवड शहर व शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दाखले यांनी म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्गावर चिखल, खड्डे यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या रोषाला महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना सामोरे जावे लागले. आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवले. एवढेच नव्हे तर सर्वसामान्य जनता रोज जो चिखल मारा सहन करते तो तुम्ही पण आज अनुभवावा, असे म्हणत नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. ही घटना अंत्यत निंदनीय व अशोभनीय असून या घटनेमुळे सरकारी आधिकारी यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा गंभीर प्रकार झाला आहे.
आमदार निलेश राणेंनी स्वत:ची राजकिय पोळी भाजण्यासाठी केलेला हा प्रकार अाहे. याप्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी गंभीरपणे लक्ष घालावे. अन्यथा महाराष्ट्रामधील अभियंता वर्ग माणसिक खच्चीकरणामुळे भविष्यात अात्महत्या करतील किंवा मृत्युला कवटाळतील अशी भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याप्रकणातील आरोपी नितेश राणे यांच्यावर कडक मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी युवराज दाखले यांनी केली आहे.