तळेगाव (Pclive7.com):- व्हॉट्सअपवर टाकलेल्या वर्चस्वाच्या पोस्टवरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. माजी आमदार बाळा भेगडे यांच्या तळेगाव येथील जनसंपर्क कार्यालयासमोर हा राडा झाला असून यामध्ये तीन कारची तोडफोड करण्यात आली आहे. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव स्टेशन येथे शुभम कॉम्प्लेक्स जवळ घडली. योगेश गायकवाड असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर तळेगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कांब्रे कामशेत येथील देवा गायकवाड आणि हरण्येश्वरवाडी, तळेगाव स्टेशन येथील सांडभोर या दोन गटात दुपारी दोनच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. व्हॉट्सअपवर वर्चस्वाच्या पोस्ट वरून सुरुवातीला वाद झाला. सांडभोर गटाने गायकवाड गटाला तळेगाव स्टेशन येथे बोलावून घेतले. गायकवाड गट तळेगाव स्टेशन येथे आला असता दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी शस्त्र काढल्याची देखील माहिती मिळत आहे. या वादामागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याचेही सांगण्यात येत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.