पिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या सांडपाणी मुक्त व जलपर्णी विरहित स्वच्छ सुंदर पवनामाई अभियानाच्या तिसऱ्या पर्वास उद्या शुक्रवार दि.१३ रोजी सायंकाळी ६ वाजता सुरूवात होणार आहे. यावेळी पवनामाईची महाआरती करण्यात येणार आहे.
चिंचवडमधील जिजाऊ पर्यटन केंद्र, मोरया गोसावी मंदिराशेजारी, येथे शहराची जीवनदायिनी पवनामाईची महाआरती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला गेली २ वर्षे अविरतपणे पिंपरी चिंचवडमधील नदीच्या प्रदूषण आणि संवर्धनावर काम करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या १०० सहयोगी संस्थांचे प्रतिनिधी, इतर सामाजिक संस्था, रोटरीला नदी स्वच्छतेसाठी सीएसआर फंडातून भरगोस निधी देणारे मेसर्स एक्साइड बॅटरीज उद्योग समूह, मेसर्स सद्गुरू इंटरप्रायजेस हिंजवडी, देश का सच्चा हिरो चंद्रकांत दामोदर कुलकर्णी, इतर नदी प्रेमी या सन्माननीय उपस्थितीमध्ये जीवनदायिनी पवनामाईची महाआरती करण्याचे नियोजन आहे.
पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जीवनदायिनी पवना नदी बद्दल नागरिकांमध्ये आत्मियता वाढावी, प्रेम वाढावे आणि त्याचबरोबर आपल्या कृतीतून नदीमध्ये कचरा अथवा कोणत्याही प्रकारचे प्लास्टीक, सांडपाणी टाकू नये अथवा सोडू नये यासाठी इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या दर पौर्णिमेला वेगवेगळ्या घाटावर रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी व इतर संस्थांच्या माध्यमातून महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. क्लबचे प्रेसिडेंट ऍड.श्री. सोमनाथ हरपुडे यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.