पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठीतील नामवंत कवींचे कवी संमेलन मंगळवार दिनांक १४ जानेवारी रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकारामनगर येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यशासनाने १ ते १५ जानेवारी दरम्यान भाषा संवर्धन पंधरवडा जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. या कवी संमेलनामध्ये ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, अरुण पवार, भरत दौंडकर, बंडा जोशी, अनिल दीक्षित, प्रशांत मोरे आदी कवी सहभागी होणार आहेत.
तरी विनामूल्य असणाऱ्या या कवी संमेलनास पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपस्थित राहावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे. तसेच या निमित्ताने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मराठी भाषा संवर्धन विषयक वक्तृत्व व निबंध स्पर्धेसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.