पिंपरी (Pclive7.com):- कुदळवाडी, चिखली परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच महिला, लहान मुले व जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण परिसरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी ‘फ’ प्रभागाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे. दरम्यान दिनेश यादव यांनी महापौर माई ढोरे यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन त्यांना दिले.
यासंदर्भात बोलताना यादव म्हणाले की, कुदळवाडी, चिखली परिसर हा संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. तसेच मोठ्या प्रमाणावर औद्योगिक, लघु उद्योजक आणि स्क्रॅप व्यावसायिक या भागात आहेत. या भागात गर्दुल्ले आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर असतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून व स्थानिक रहिवाशी, सर्वसामान्य नागरिक, महिला, लहान मुले व जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या भागात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.
मोई फाटा चौक, चिखली मेन चौक, कुदळवाडी चौक, पवार वस्ती चौक, भैरवनाथ मंदिर चौक, मोरे पाटील चौक या मोक्याच्या ठिकाणी सदर सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर बसविण्यात यावेत, अशी मागणी यादव यांनी महापौर माई ढोरे यांच्याकडे केली आहे.