- संदेश पुजारी –
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपा कोणाला संधी देणार याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. गेल्यावर्षी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ‘शब्दा’मुळे यावेळी शितल शिंदे यांची वर्णी लागेल अशी अपेक्षा होती. मात्र अचानकपणे संतोष लोंढे यांचे नाव पुढे आले. पक्षादेशानुसार त्यांनी अर्जही दाखल केला. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती म्हणजे महेशदादांनी दिलेला ‘शब्द’ पाळला असल्याची..!
२०१४ ची विधानसभा निवडणुक महेश लांडगे यांनी अपक्ष लढविली होती. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय नगरसेवक- पदाधिकाऱ्यांनी समर्थन दर्शवले होते. पक्षशिस्तभंगाच्या कारवाईला न जुमानता अनेकांनी महेश लांडगे यांच्यासाठी निवडणुकीत ताकद पणाला लावली होती. ‘मी आमदार झालो, तर महापालिकेतील पदांसाठी कुणाच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही’, असा ‘शब्द’ त्यावेळी महेश लांडगेंनी समर्थकांना दिला होता. त्या निवडणुकीत भरघोस मतांनी ते निवडून आले होते. त्यानंतर २०१७ मध्ये महेश लांडगेंनी भाजपात प्रवेश केला. महापालिकेत सत्ता मिळवली आणि महापालिकेतील सत्तेच्या तीन वर्षांच्या काळात आपल्या समर्थक नगरसेवकांना महापालिकेतील मानाची पदे देण्याचा ‘शब्द’ पूर्ण करून दाखवलायं. महापालिकेत पहिल्याच वर्षी महेश लांडगेंनी अनेक दिग्गज दावेदार असताना देखील नितीन काळजे यांना महापौर केले. त्यानंतर दुसऱ्यावर्षी राहुल जाधव यांना महापौरपदी विराजमान करत समाविष्ठ गावांना न्याय देण्याचा दिलेला ‘शब्द’ पूर्ण केला. आता देखील तसचं घडलयं, स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात घालणार असल्याचा ‘शब्द’ महेश लांडगेंनी संतोष लोंढे यांना दिला होता.
त्यानुसार शहराध्यक्षपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर महेश लांडगेंनी पक्षावर पकड मजबूत करण्यास सुरूवात केलीयं. त्याचाच प्रत्येय आज आलायं. स्थायी समिती अध्यक्षपदी लांडगेंनी त्यांचे समर्थक संतोष लोंढे यांना संधी देत आपणच राजकीय डावपेचातील ‘पैलवान’ असल्याचे सिध्द करून दाखवलयं. स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपाचे निष्ठावंत शितल शिंदे हे प्रबळ दावेदार होते. मात्र राजकीय खेळी करत शिंदे यांचा ‘पत्ता कट’ करण्यात ते यशस्वी झालेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून संतोष लोंढे यांच्या नावाला हिरवा कंदील मिळवत पुढील मार्ग सुकर करून घेतला. म्हणूनच कोणत्याही अडचणी शिवाय लोंढे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल झालायं.
आता स्थायी समितीत भाजपाचे संख्याबळ जास्त असल्यामुळे संतोष लोंढे यांची निवड निश्चित मानली जात आहे. शुक्रवारी निवडणुकीची औपचारिकता देखील पार पडेल. लोंढे स्थायीचा कारभारही सुरू करतील. मात्र शहराच्या राजकीय इतिहासात नोंद राहिल ती म्हणजे महेशदादांनी दिलेला ‘शब्द’ पाळला असल्याचीच, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे.