पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवती संघटना व सामाजिक न्याय महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीसाठी व आरोग्याच्या जनजागृतीसाठी तंबाखू, गुटखा तसेच सिगारेटची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. अजंठानगर येथे दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वर्षा जगताप, गंगा धेंडे यांच्या नेतृत्वात या प्रतिकात्मक होळीचे आयोजन करण्यात आले होते.
याबाबत बोलताना शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, आजचा तरुण दारूचे व्यसन करून वाहन चालविल्यामुळे अनेक अपघात होतात. त्यामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. कर्करोगासारख्या महाभयंकर रोगांना त्यामुळे अनेकांना सामोरे जावे लागते. श्वसनाचा त्रास, फुफ्फूसाचे विकार, मेंदूवरील संतोलन जाणे, असे अनेक रोग होण्याची शक्यता असते. आजची तरूण पिढी ही भविष्याचा कोणताही विचार न करता व्यसनाला महत्व देत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे, हे नाकारता येत नाही.
वर्षा जगताप म्हणाल्या कि, आजच्या तरुण पिढीमध्ये तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात लक्ष न देता व्यसनाधीन होऊन अभ्यासापासून वंचित राहतात, म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुटक्याची होळी करुन प्रबोधनाचा संदेश देत आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेला आहे.
यावेळी पक्ष प्रवक्ते फजल शेख, कविता ताठे, ऋतुजा बिराजदार, श्वेता पाटे, शलाका बनगर, हिना आत्तार, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनिषा गटकळ, महिला कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, प्रदीप गायकवाड, रशिद सय्यद, रविराज साबळे, राहुल चौधरी, नवनाथ साबळे, रुपेश धेंडे, राहुल साखळे, पल्लवी साखळे आदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.