पुणे (Pclive7.com):- पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील परमिट रूम आणि क्लब 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी घेतला आहे. पुणे जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी परमिट रूम आणि क्लब बंद ठेवण्याचे आदेश दिले असले तरी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील देशी दारूची दुकाने व वाईन शॉप ही तूर्तास तरी खुली राहणार आहेत.
पुणे पिंपरी चिंचवड मधील सर्व एफएल 3 (खाद्यगृहमध्ये उत्पादन शुल्क भरलेले भारतीय बनावटीचे विदेशी मद्य व इतर विदेशी मद्याची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती) (तारांकीत हॉटेल वगळून) फॉर्म ई/ ई -2/ तसेच एफएल-4 (उत्पादन शुल्क भरलेले विदेशी मद्य व भारतीय बनावटीचे विदेशी मद्याची नोंदणीकृत क्लबमध्ये विक्री करण्याकरताची अनुज्ञप्ती (कायमस्वरूपी) एफएल-4 (तात्पूरती) या अनुज्ञप्त्यांचे व्यवहार दि.18 मार्च ते 31 मार्च 2020 अखेरपर्यंत पूर्णपणे बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशाअंतर्गत विमान प्रवासाव्दारे प्रवासी देशात सर्वत्र प्रवास करत आहेत. असे प्रवासी पुणे जिल्हयात परदेश प्रवास करून आलेले आहेत व त्यातील बरेच प्रवाशी परतीच्या मार्गावर आहेत, त्यामुळे कोरोनो विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग असल्यास त्यात अधीक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे, अशा प्रवाशांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्हयात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे या बाबी टाळणे आवश्यक आहे. विषाणूची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम-142 नुसार पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व परमिट रूम आणि क्लब दि.18 मार्च ते 31 मार्च 2020 अखेरपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. आदेशाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियमन, 1949 व त्या अंतर्गत असलेल्या कलम व नियमांनुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी राम यांनी आदेशात म्हटले आहे.