पिंपरी (Pclive7.com):- राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना पिंपरी चिंचवडकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सुरूवातीला सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या ११ दिवसात कोरोनाचा एकही ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळलेला नाही. प्रशासकीय यंत्रणेची मेहनत तसेच नागरिकांनी घेतलेल्या काळजीमुळे हा ‘रिझल्ट’ समोर आला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान परदेशातून शहरात आलेल्या १४९८ जणांना ‘होम क्वारंटाईन’मध्ये ठेवण्यात आले आहे. तर, आज अखेर शहरातील १ लाख ५०३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याशिवाय कोरोनामुक्त झालेल्या ९ रूग्णांना घरी सोडण्यात आले. तर उर्वरित ३ पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आज दि.३१ पर्यंत एकुण २६३ व्यक्तींचे कोरोना (कोवीड १९) करीता घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. पैकी आज अखेर २३१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तसेच आज दि.३१ रोजी एकुण २३ व्यक्तींना नविन भोसरी रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले असून त्यांचे कोरोना (कोवीड १९) करीता घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या २४४ कर्मचारी यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. आज दि.३१ अखेर शहरातील १० लाख ५०३ (कन्टेंनमेंट झोन सर्वेक्षण आणि होम क्वॉरंटाईन दैनंदिन सर्वेक्षण) नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आलेले असून पिंपरी चिंचवड मनपामध्ये आज अखेर १४९८ व्यक्तींना घरातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. घरातील अलगीकरणात असणा-या नागरिकांनी बाहेर पडू नये. अशी व्यक्ती बाहेर पडल्याचे आढळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेच्या सारथी हेल्पलाईन ८८८८००६६६६ यावर कळवावी असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
कोरोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. पिं.चिं. मनपामार्फत हेल्प लाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ हा आहे. तसेच ९९२२५०१४५० हा WhatsApp क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित कोरोना रुग्ण संबंधित माहिती देण्याचे आवाहन नागरीक तथा सर्व वैद्यकीय व्यावसायिक यांना करण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group