नवी दिल्ली (Pclive7.com):- भारत-पाकिस्तान सीमेवर आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांशी सुरक्षारक्षकांची जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन लष्करी अधिकाऱ्यांसोबत तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुमारे आठ तास ही धुमश्चक्री सुरु होती. एएआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. शहीदांमध्ये २१ राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अशुतोष शर्मा यांचा समावेश आहे. शर्मा यांचा यापूर्वी अनेक यशस्वी काउंटर टेररिझम मोहिमांमध्ये महत्वाची भुमिका राहिली आहे.
गुप्तचरांच्या माहितीनुसार, कुपडावा जिल्ह्यातील हंदवाडा येथील चांगिमुला येथे काही स्थानिक नागरिकांना बंदी बनवणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवण्यात आली, अशी माहिती लष्करी सुत्रांनी दिली.
हंदवाडा मोहिमेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, दहशतवादी घुसलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे ५ जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक जवान अशा सहा जणांची टीमने इथं प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी इथल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले.
दरम्यान, इथं लपून बसलेले दहशतवाद्यांना या जवानांची चाहूल लागल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणावर जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. याला जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. मात्र, यामध्ये दोन लष्करी अधिकाऱ्यांसह दोन जवान आणि एक जम्मू-काश्मीर पोलीसांचा सब इन्पेक्टर असे पाच जण शहीद झाले, लष्कराच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.






















Join Our Whatsapp Group