पिंपरी (Pclive7.com):- नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष सुनिल गव्हाणे यांची निवड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दूहान यांनी जाहीर केली, आणि पक्षाच्या संघटनात्मक कार्यकर्त्यांच्या विश्वात आता ती चर्चेचा विषय बनून राहिली आहे. कोण आहे सुनिल गव्हाणे? अचानक या चर्चेला राजकीय वर्तुळात सुरुवात झाली. सुनील गव्हाणे मूळचे अहमदनगर जिह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पोटाची खळगी भरण्यासाठी या पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील पोरगं…
घरातील हालाकीची आर्थिक परिस्थिती, आई अशिक्षित, वडील ७वी नापास, सातत्याने छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये बदलत राहणारी नोकरी, शेवटी कंपनी बंद पडली म्हणून बेरोजगारीची कुर्हाड कोसळलेली. त्यामुळे आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे. परंतु तरीसुद्धा जिद्दीने संकटावर मात करत सुनीलने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. घरच्या गरीब परिस्थितीमुळे लहानपणापासून झालेली सामाजिक जडण घडण, समाजप्रति आपलं असलेलं देणं याची जाण ठेऊन कॉलेजवयीन जीवनात त्यांनी सक्रिय विद्यार्थी चळवळ उभी केली. धडपड्या सुनीलने माध्यमे किंवा जाहिरातबाजी याला फाटा देत महाविद्यालयाच्या वाढीव फी विरोधात आंदोलन छेडले. यातूनच पुढे महाविद्यालयीन प्रतिनिधी बनून संपर्क आणि मित्र जोडत स्वतःची विद्यार्थी संघटना उभी केली. नंतर महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर कोचिंग क्लासेस त्यातून बसवलेली आर्थिक घडी. मात्र समाजकारणाची आवड गप्प बसू देईना म्हणून अधिकृत पक्षाच्या झेंड्याखाली येऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवत राहिले.
परिणामी पिंपरी चिंचवडवर कायम विशेष लक्ष देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नजरेने सुनील गव्हाणे यांना हेरले. सुनील गव्हाणे यांची वक्तृत्व शैली, चळवळीतील कामाची पद्धत हेरली आणि पक्षाचे विद्यार्थी संघटनेच्या कार्याध्यक्ष पदापासून नंतर शहराचे अध्यक्षपद दिले, पिंपरी चिंचवड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ला, परंतु मागील निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर संघटनेच्या पातळीवर बरेच बदल केले त्यातला हा एक बदल म्हणलो तरी चालेल. विशेष म्हणजे सुनील गव्हाणे यांच्या कामाची दखल घेत २०१८ च्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पत्नीला पक्षाची अधिकृत उमेदवारी देऊ केली, त्यात स्थानिक नेत्यांनी कायम सुनील गव्हाणे यांच्या कामाची नोंद घेतली आणि पक्षश्रेष्टीना ती दिसली असे म्हणावे लागेल.
खुद्द अजित पवार, पक्षाचे विद्यमान अध्यक्ष जयंत पाटील यांनी कामाची आणि पक्षावरील निष्ठेची दखल घेतली. मागील ८-९ वर्ष कामातील, चळवळीतील सातत्यता लक्षात ठेवून शहरातील राजकारणात आपला ठसा सुनील गव्हाणे यांनी उमटवला आहे. अर्थात सध्याचे सरकार हे महाविकासघाडीचे आहे, त्यात राष्ट्रवादी पक्षाचे स्थान अतिशय महत्वाचे आहे, त्यातच या सामान्य कार्यकर्त्याची प्रदेशाध्यक्ष पदी झालेली निवड म्हणजे मावळ लोकसभेत आणि पक्षात पार्थ पर्व सुरु झाले आहे असे दिसते. सुनील गव्हाणे यांची निवड म्हणजे पार्थदादा पवार पिंपरी चिंचवडमध्ये संघटनात्मक पातळीवरसुद्धा जातीने ऍक्टिव्ह असल्याचे दिसून येत आहे. नजीकच्या काळात याचा अनुभव येत राहील अशी चर्चा आहे.
अशातच चिंचवड विधानसभेतील स्थानिक नेत्याने घेतलेला जाणीवपूर्वक पुढाकार, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका, अशा राजकीय पार्श्वभूमीवर गरीब घरातील सामान्य कार्यकर्त्याला मिळालेली ही महाराष्ट्र पातळीवर संधी पक्षात आणि पिंपरी चिंचवड शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
ही निवड जाहीर करत राष्ट्रवादी पक्ष हा कात टाकतोय का? येणाऱ्या काळात सर्व सामान्य घरातील कार्यकर्त्यांना, युवकांना युवतींना महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू म्हणून प्रस्थापित करत येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी strategy ही गेम चेंजर ठरणार का? हे येणारा काळच ठरवेल. कारण अशीच निवड पूर्वी खुद्द शरद पवार यांनी वक्तृत्वाच्या जोरावर आणि कामाच्या पद्धतीवर स्व.आर आर पाटील, जितेंद्र आव्हाड, लक्ष्मण ढोबळे, कवी ना धो महानोर, यांसारख्याची पक्षात मोठ्या पदावर नेमणूक केली होती. अगदी असाच पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि जलसंपदा मंत्री तथा प्रांताध्यक्ष मा.जयंत पाटील यांनी केलेल्या अलिकडच्या काळात केलेल्या विविध निवडींच्या मध्ये दिसते. तरी राज्य पातळीवर या निर्णयावर खूप जोरदार चर्चा चालू आहे हे दिसते.