पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाची स्थिती अत्यंत भयानक झाली आहे. कोरोनाच्या रूग्ण संख्येत प्रचंड वाढ होत असल्यामुळे रूग्णांना बेड मिळत नाहीत. त्यामुळेच रूग्णांना अक्षरश: जमिनीवर तसेच खुर्च्यांवर झोपवून उपचार केले जात आहेत.
ही अंगावर काटा आणणारी स्थिती आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील, कोरोनाच्या या महासंकटात रूग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टराकडून अशा प्रकारे प्रयत्न केले जात आहेत.
कोरोनाच्या दुस-या लाटेचे थैमान कमी होण्याऐवजी पिंपरी चिंचवडमध्ये वाढतच चालले असल्याचे चित्र आहे. वाढत्या रूग्ण संख्येमुळे शहरातील सर्वच कोविड सेंटर व खासगी हाॅस्पिटले रूग्णांनी तुडूंब भरल्याची आज सोमवारची स्थिती आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्वात मोठे असलेल्या वायसीएम रूग्णालयावर दिवसेंदिवस पडणारा ताण पाहता मागील आठवड्यातच हे रूग्णालय कोविड रुग्णांसाठी समर्पित करण्यात आले आहे. सध्या दररोज दोन ते अडीच हजार रूग्ण शहरात नव्याने बाधित होत आहेत. बेड उपलब्ध नसणे या समस्येला आता शहरातील कोविड रूग्णांचे ‘हेड क्वार्टर ‘समजल्या जाणा-या वायसीएमलाही सामोरे जावे लागत असल्याची स्थिती आहे.
आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि वाट्टेल ती यंत्रणा खरेदी करण्याची ताकद पिंपरी महापालिकेची आज आहे. परंतू रूग्ण संख्या दररोज वाढतच असल्याने आरोग्य कर्मचारी, डाॅक्टर व परिचारिका यांना सर्वांची सेवा करताना त्यांच्यावर पडत असलेला ताण व त्यांना येत असलेले नैराश्य यावर मात्र काहीच इलाज नसल्याची स्थिती आहे.