पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने शिरकाव केला आहे. हा आजार झालेल्या रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएमसह अन्य खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. उपचारासाठी अॅम्फोटेरीसीन-बी (Amphotericin-B) हे इंजेक्शन उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु, रुग्णांसाठी हे इंजेक्शन व इतर आवश्यक औषधे उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या इंजेक्शनची मागणी आणि पुरवठ्याचे समीकरण बिघडले आहे. हे रुग्णांच्या जिवावर बेतणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पिंपरी चिंचवडसाठी तातडीने अॅम्फोटेरीसीन-बी इंजेक्शनचा पुरवठा सुरळित करून त्याचा तुटवडा निर्माण होऊ देऊ नये, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोनाच्या संकटानंतर आता नागरिकांना म्युकरमायकोसिस आजार होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आतापर्यंत या बुरशीजन्य आजाराचे ६४ रुग्ण दाखल आहेत. त्यांपैकी २३ रुग्णांवर उपचार सुरू असून, गंभीर बाब म्हणजे या आजाराने १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजमितीला ३१ रुग्ण या आजारावर उपचार घेत आहेत. या आजारावर उपचारासाठी अॅम्फोटेरीसीन-बी इंजेक्शन व इतर औषधांची आवश्यकता आहे. परंतु, या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.
अॅम्फोटेरीसीन-बी इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्राप्त होत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. अॅम्फोटेरीसीन-बी इंजेक्शनचा पुरवठा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरीत होत आहे. आपल्या कार्यालयामार्फत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासाठी अॅम्फोटेरीसीन-बी इंजेक्शन उपलब्ध केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. याआधीही कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन अभावी नाहक त्रास सहन करावा लागला आहे. हे इंजेक्शन मिळाले नाही म्हणून काही रुग्ण दगावले गेले हे नाकारता येणार नाही. आता पुन्हा म्युकर मायकोसिसबाबत तशीच परिस्थिती पुन्हा उभी राहते की काय असा प्रश्न पडत आहे?
पिंपरी चिंचवडमध्ये म्युकरमायकोसीस रुग्णांच्या संख्येत भर पडल्याने या रुग्णांना वेळेत उपचार देण्यासाठी अॅम्फोटेरीसीन-बी या इंजेक्शनच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. मात्र या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शनची मागणी आणि पुरवठ्याचे समीकरण बिघडले आहे. त्याची जिल्हाधिकारी कार्यालयाने कोणताही विलंब न करता तातडीने दखल घ्यावी. म्युकरमायकोसीस आजाराचा वाढत्या संसर्गाची गांभीर्याने दखल घेऊन वायसीएम हॉस्पिटल व इतर सर्व खाजगी कोविड रुग्णालयांतील रुग्णांना अॅम्फोटेरीसीन-बी या इंजेक्शनचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.