पिंपरी (Pclive7.com):- थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन रुग्णालयात ओम जय आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘डायलेसिस सेंटर’ सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात ओम जय आनंद चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी पंकज सुराणा आणि अपक्ष आघाडीचे गटनेते तथा स्थानिक नगरसेवक कैलास बारणे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, श्री ऑल इंडिया जैन कॉन्फ्रेंसच्या वतीने ओम जय आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या संयोजनाखाली थेरगाव येथील डांगे चौकात अशोकजी सुराणा यांच्या जागेमध्ये गेल्या ४ वर्षापासून गरीब रुग्णासाठी डायलेसिस सेंटर सुरु केले आहे. सदर डायलेसिस सेंटर वातानूकुलीत असून एकूण ७ मशीनच्या माध्यमातून डायलेसिस केले जाते. फक्त ६००/- रूपयाच्या नाममात्र शुल्कमध्ये डायलेसिस केले जाते.
आजपर्यंत एकूण ११ हजार डायलेसिस यशस्वीपणे पूर्ण झाली असून या परिसरातील रुग्णांना फार मोठी मदत झाली आहे. थेरगाव येथे मनपाचे भव्य रुग्णालय उभारले गेले आहे. सदर रुग्णालायमध्ये हे डायलेसिस सेंटर स्थलांतरित करून पूर्णपणे आमच्या वतीने उभारले जावे अशी विश्वस्तांची इच्छा आहे.
या हॉस्पिटलमुळे रुग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना/महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळून डायलेसिस मोफत होऊ शकेल. सदर डायलेसिस सेंटर ७ मशीनसहित अद्यायावतपणे उभारून देण्याची जबाबदारी ट्रस्टचीच राहील. तरी या मागणीचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी ओम जय आनंद चॅरिटेबलच्यावतीने करण्यात आली आहे.