पुणे (Pclive7.com):- पुण्यातील धानोरी परिसरात राहणाऱ्या महिलेसह तिच्या सहा वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर आता या महिलेच्या पतीचा मृतदेह पोलिसांना खानापूर येथे आढळून आला आहे. सासवड आणि कात्रच्या नवीन बोगद्याजवळ बुधवारी माय लेकांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलीस आबिद शेखच्या मागावर असतानाच त्याचा मृतदेह आढळून आल्याने या प्रकरणातील गूढ आणखीन वाढलं आहे.
पिकनिकसाठी गेलेल्या शेख या कुटुंबाची हत्याझाल्याने पुण्यात बुधवारी खळबळ उडाली होती. सासवड-जेजुरी रस्त्यावरील एका गावात सकाळी सात वाजता महिलेचा मृतदेह आढळला. तर तेथून ३५ किमी दूर कात्रजजजळ पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला. दरम्यान पती आबिद शेख बेपत्ता असल्याने प्रकरणाचं गूढ वाढलं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलिया अबीद शेख (वय ३५) आणि आयान शेख (वय ६) यांची हत्या करण्यात आली आहे, तर एका विमा कंपनीत ब्रांच मॅनेजर म्हणून काम करणारा पती आबिद सुद्धा बेपत्ता होता. हे कुटुंब मूळचं मध्य प्रदेशातील असून पुण्यात लोहगावमधील ब्रुकलिन-प्राईड वर्ल्ड सिटीमध्ये वास्तव्यास होतं. काल मायलेकांचा मृतदेह सापडल्यानंतर आज आदिबचाही मृतदेह सापडल्याने नक्की या तिघांसोबत काय घडलं यासंदर्भातील गूढ वाढलं आहे.
झोन दोनचे उपायुक्त सागर पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, धानोरी परिसरात आबिद शेख, पत्नी आलिया व त्यांचा मुलगा आयान असे तिघे जण राहत होते. पती आणि पत्नी हे उच्च शिक्षित होते. पती आबिद हा एका फायनान्स कंपनीत कामाला होता. तर पत्नी आलिया यांनी मुलगा आयानच्या आजारामुळे अडीच वर्षांपूर्वीच नोकरी सोडली होती. त्याच्यावर उपचार देखील सुरू असताना, आयानला शिकणवण्यासाठी घरीच एक शिक्षिका देखील येत होती.
दरम्यान सोमवारी तिघेजण फिरण्यास बाहेर जाणार असल्याने, आबिद चारचाकी गाडी घेऊन आला व त्यानुसार तिघेजण फिरण्यास गेले. मात्र तेथून पुढे, या तिघांचा कोणाला संपर्क झाला नाही. पत्नी आलियाचा मृतदेह सासवड येथे आढळून आला. तर सहा वर्षाच्या आयानचा मृतदेह कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ आढळून आला.