बाणेर (Pclive7.com):- बाणेर येथील हाऊस ऑफ मीटचे संचालक राहुल नरूटे आणि मंदार निरगुडे यांच्यावतीने वर्ल्ड कपसाठी वॉल क्लायंबिग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हृतिक मारणे यांना ७५ हजार रूपयांचा धनादेश देवून मदतीचा हात दिला.
यावेळी भूगावचे माजी सरपंच बाळासाहेब शेडगे, प्रशिक्षक अमोल जोगदंड, हाउस ऑफ मीटचे संचालक राहुल नरुटे, मंदार निरगुडे आदी उपस्थित होते.
याबाबतीत श्री.नरुटे म्हणाले कि, आपण आपला व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी जपत गरजू गरीब खेळाडूंना मदत केली पाहिजेत. खेळाडू हे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे नाव उंचावत असतात. अशा खेळाडूंना मदत करणे म्हणजेच एक प्रकारची देशसेवाच आहे. देशाचे नाव जगात झळकवणाऱ्या खेळाडूस मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे. हृतिक मारणे सारख्या गरीब आणि होतकरू खेळाडूला मदत करणे हे माझ्यासाठी देशसेवाच आहे. अशा माध्यमातून मला देशसेवा करण्याचे भाग्य लाभले आहे.
खेळाडू ह्रतिक म्हणाले कि, ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी १२ वर्ल्डकप आणि एक चॅंपियनशिप मध्ये सहभागी होवून रॅंकिंगचा उचांक टिकवून ठेवावा लागतो. मात्र माझ्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे गेल्या वर्षी ७ वर्ल्ड कप व एक चॅंपियनशिप स्पर्धेत सहभागी होता आले. त्यामुळे ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. नरुटे साहेबांसारख्या दानशूर व्यक्तीकडून आर्थिक मदत झाल्यास नक्कीच भारताला पदक मिळवून देइन असा विश्वास व्यक्त केला.
मी ऑस्ट्रियामध्ये एक महिना प्रशिक्षण घेणार आहे. दिनांक १७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या स्लोव्हेनिया मधील आयएफएससी वर्ल्डकप मध्ये सहभागी होणार आहे. तसेच १५ ते २२ ऑगस्ट दरम्यान रशियामधील मॉस्कोमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅंपियनशिप स्पर्धा खेळणार आहे. त्याचबरोबर २०२२ साली चायनात होणाऱ्या एशियन गेम्स आणि 2024 ला पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकसाठी कसून तयारी करीत आहे.