मुंबई (Pclive7.com):- भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (आय.एस.टी.ई.) सर्वात प्रतिष्ठित असलेला “भारतीय विद्या भवन उत्कृष्ठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा वर्ष २०२०” साठीचा पुरस्कार पुण्याच्या जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या स्वायत्त महाविद्यालयास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उच्य, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दि.०५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने संचालक प्रा. गिरीराज सावंत यांनी पुरस्कार स्वीकारला.
“भारतीय विद्या भवन” उत्कृष्ठ अभियांत्रिकी प्राचार्याचा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. राकेशकुमार जैन यांना देण्यात आला. तसेच प्राध्यापक डॉ. सुनिल जी. कांदळकर यांना “उत्कृष्ठ प्राध्यपक पुरस्कार २०२०” देण्यात आला. शरद संजय कोरेकर यास उत्कृष्ठ विद्यार्थ्याचा पुरस्कार देण्यात आला. मुंबई येथील वाय. बी.चव्हाण सेन्टर येथील अत्यंत सुसूत्र आणि शिस्तबद्ध ५०व्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यास भारतभरातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, जेष्ठ शिक्षण तज्ञ, प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते. भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिह देसाई, सचिव प्रा. विजय वैद्य, महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे अध्यक्ष डॉ. रणजित सावंत, इतर सदस्य उपस्थित होते. प्रा. महेश काकडे यांनी सूत्रसंचलन केले तर प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी आभार प्रदर्शन केले.
भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (आय.एस.टी.ई.) ची स्थापना १९४१ मध्ये झाली असून ही राष्ट्रीय पातळीवर तंत्रशिक्षणाच्या प्रसारासाठी कार्यरत असणारी परिषद आहे. परिषदेचे देशातील प्रत्येक राज्यात तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कार्य आहे आणि देशभरातील जवळजवळ सर्व तंत्रशिक्षण महाविद्यालये सभासद असून, अनेक विद्यार्थी सभासद आहेत. तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या संस्थांना आणि प्राध्यापकांना परिषद दरवर्षी पुरस्कार देऊन प्रोत्साहन देत असते.
जे.एस.पी.एम. च्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचा जी.एफ.एम.चा “शाहू पॅटर्न” हा विद्यार्थी आणि पालकांमध्ये अतीशय प्रसिद्ध आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थ्यांची वैय्यक्तिक जबाबदारी घेऊन मार्गदर्शन करतात, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पूर्ण लक्ष देण्यात येते. महाविद्यालयातून पदवी प्राप्त विद्यार्थी हे चांगली प्लेसमेंट मिळवतात तसेच काही विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठात प्रवेश घेतात. उत्तम गुणवत्ता आणि प्लेसमेंट साठी राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय सर्वत्र सुप्रसिद्ध आहे. महाविद्यालयास संचालक प्रा. रवींद्र सावंत आणि प्रा. सुधीर भिलारे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव माननीय आमदार प्रा. डॉ. तानाजीराव जयवंतराव सावंत यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेशकुमार जैन, प्रा. डॉ. सुनिल जी. कांदळकर आणि विद्यार्थी शरद संजय कोरेकर तसेच सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापकांचे अभिनंदन करून कौतुक केले.