चिंचवड (Pclive7.com):- राज्य सरकारने महिला सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री लाकडी बहिण योजना’ सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठी चिंचवड येथे उद्या (मंगळवार, दि.९) पासून शुभारंभ होणार आहे. चिंचवड येथील चिंचवडे मंगल कार्यालयात अर्ज भरून घेतले जाणार आहेत.

राज्य शासनाने मुख्यमंत्री लाकडी बहिण योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला १५ जुलैपर्यंत ठेवली होती. महिलांना कागदपत्रांची जुळवणी आणि अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी या मर्यादेत शासनाने सुधारणा केली. आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलै २०२४ पासून दरमहा १ हजार ५०० रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या ४ पैकी कोणतेही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार आहेत. २ लाख ५० हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल मात्र कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल त्यांनी उत्पन्नाच्या दाखला देण्याची आवश्यकता असणार नाही.
या योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष ऐवजी २१ ते ६५ वर्षे असा करण्यात आला आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. या योजनेचा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला देखील लाभ देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री लाकडी बहिण योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांनी अर्ज करावेत. पात्र महिलांना आर्थिक साहाय्य मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या महिलांचा कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढेल. त्यामुळे महिलांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले आहे.
























Join Our Whatsapp Group