पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरातील कबड्डीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी व्यावसायिक कबड्डी संघाची घोषणा करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या निर्णयाचे क्रीडा विश्वातून स्वागत होत आहे.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2021/12/Satyam-APSARA-3.jpg)
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे होत्या.
भाजपा नगरसेवक आणि फ-प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड यांनी गेल्या दीड वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा व्यावसायिक कबड्डी संघ असावा यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा समितीकडून तसे धोरण ठरवण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक गुणवंत कबड्डीपटूंना पुणे, मुंबईसह परराज्यातील कंपन्यांकडे नोकरीसाठी व्यावसायिक संघात स्थान मिळवावे लागत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक खेळाडुंना संधी मिळण्यासाठी व्यावसायिक संघ तयार करावा, असा प्रस्ताव ठेवला होता.
क्रीडा समिती सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी या प्रस्तावावर सूचक म्हणून, तर नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे.
नगरसेविक कुंदन गायकवाड म्हणाले की, कबड्डीमध्ये मैदान गाजवणारे अनेक खेळाडू पिंपरी-चिंचवडमध्ये आहेत. मात्र व्यावसायिक संघाचे ‘व्यासपीठ’ नसल्यामुळे अनेक खेळाडूंचे कौशल्य लपून राहिले. आर्थिक मदत आणि व्यवसायिक संघाचे पाठबळ या दोन्ही गोष्टी मिळत नसल्यामुळे अनेक खेळाडू पुढे जाऊ शकले नाही. ही खंत एक खेळाडू म्हणून माझ्या मनात कायम होती. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कोणत्या गोष्टीचा पाठपुरावा केला असेल तर पिंपरी-चिंचवडमध्ये व्यावसायिक संघ व्हावा याचा. यामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्रीडा समितीचे उत्तम केंदळे यांनी पाठपुरावा केला.
आज पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या सभागृहात व्यावसायिक संघाला मान्यता मिळाली असून हा ठराव महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पारित झाला आहे .यामुळे शहरातल्या खऱ्या कबड्डीपटूना आता इतर महापालिकांच्या किंवा संस्थांच्या व्यवसायिक संघाचे उंबरे झिजवावे लागणार नाही. याशिवाय आर्थिक मदतीचे पाठबळही या खेळाडूंना लाभेल. त्यामुळे आपले खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्की चमकतील. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या व्यवसायिक कबड्डी संघात आपल्या शहरातील खेळाडूंना प्राधान्य द्यावे अशी मागणी मी यानिमित्ताने केली आहे.
‘सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार’ची घोषणा…
महापालिका सर्वसाधारण सभेत मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार, आगामी काळात पिंपरी-चिंचवड महापालिका ‘सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार’ची घोषणा करणार आहे. त्याअंतर्गत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रतिभावान खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि मार्गदर्शकांना गौरविण्यात येणार आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय खेळाडू पुरस्कार धोरणही तयार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या अ,ब,क वर्ग व्यायाम शाळांबाबतही धोरण तयार करण्यात येईल. विशेष म्हणजे, मुले आणि मुलांसाठी स्वतंत्र व्यावसायिक कबड्डी संघ तयार करण्यात येणार असून, त्याचे धोरण ठरविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना सोपवण्यात आले आहेत.