पिंपरी (Pclive7.com):- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे शुभहस्ते पुणे महानगरपालिका हद्दीतील वनाज कोथरुड ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे रविवार दि. ०६ मार्च २०२२ रोजी उद्घाटन होत आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पिंपरी ते फुगेवाडी दरम्यान मेट्रो मार्गाचे काम पुर्ण झाले असल्याने या मार्गाचेही उद्घाटन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे शुभहस्ते रविवार दि. ०६ मार्च २०२२ रोजी स. ११.१५ वा. ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली. यावेळी त्यांचे समवेत सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना महापौर म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड हद्दीतील पिंपरी ते फुगेवाडी या मार्गीकेचे काम पुर्ण झाले असल्याने या मार्गाचे उद्घाटनासाठी ऑनलाईन यंत्रणेची व्यवस्था पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन येथील मेट्रो स्टेशनवर केली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते गरवारे कॉलेज पुणे येथुन मेट्रोला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर तेथेच पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो मार्गाचे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत.
त्याचवेळी मनपाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व पत्रकार पिंपरी ते फुगेवाडी या दरम्यान मेट्रोतुन प्रवास करतील. मेट्रोच्या उद्घाटनामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मेट्रोतुन प्रवास करण्याची संधी लवकरच प्राप्त होवुन त्याचा आनंद लुटता येणार आहे. अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.