मालमत्ता कर सवलतीच्या योजनांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महिलांच्या नावाने असलेल्या निवासी मिळकतींवर सन २०११-१२ पासून सामान्य करात ५० टक्के सवलत दिली जाते. सवलतीचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी अर्ज करावा लागतो. सवलतीचा लाभ घेताना यापूर्वी २०२१-२२ पर्यंत महिलांना इतर कुठल्याही मालमत्ताकरात सवलत मिळत नसल्याचे प्रतिज्ञापत्र व अर्ज सादर करावा लागत होता. परंतु, यावर्षीपासून ही कार्यपध्दती बदलून जुन्या ज्या मिळकतींना सामान्य करामध्ये ५० टक्के सवलत लागू केली होती. ही सवलत २०२२–२३ मध्ये कायम ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली. इतर ज्या ठिकाणी अशाच एकाच मिळकतीला महिलांना लाभ मिळत नसेल, अशा महिलांनी महापालिकेकडे विहित नमुन्यानुसार अर्ज करावा, तसेच नागरिकांनी महापालिकेच्या मालमत्ता कर सवलतीच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
महापालिकेकडे एकूण ५ लाख ७१ हजार निवासी व बिगरनिवासी मिळकतींची नोंद आहे. मिळकतकरासाठी पालिकेच्या वतीने विविध सलवती दिल्या जातात. निवासी मिळकत महिलेच्या नावा असल्यास सामान्यकरात ५० टक्के सवलत दिली जाते. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात एकूण ७ हजार ९९२ महिलांनी त्या सवलतीचा लाभ घेतला आहे. ती एकूण रक्कम २ कोटी २ लाख इतकी आहे. शहरातील घर, बंगला किंवा सदनिका नावावर असलेल्या महिलांनी विभागीय कर संकलन कार्यालयात त्याची नोंदणी करून घेतल्यास सवलतीचा लाभ दिला जातो.
माजी सैनिकांच्या मिळकती सवलतीचा लाभ १ हजार ९१२ मिळकतधारकांनी घेतला आहे. ती एकूण सवलत १ कोटी ४१ लाख आहे. ऑनलाइन भरणा केल्यास १० ते ५ टक्के सूट दिली जाते. त्याचा लाभ तब्बल १ लाख ५३ हजार २०६ मिळकतधारकांनी घेतला. ही एकूण रक्कम १२ कोटी ७४ लाख आहे. शौर्यपदक धारक मिळकतींनाही सूट दिली जाते. शहरातील एकूण ७ मिळकतींना १ लाखाची सूट दिली गेली आहे. मुदतीपूर्वी बिलाचा भरणा केल्यासही मोठी सुट दिली जाते. एकूण ३७ हजार ५०८ मिळकतधारकांनी मुदतीच्या पूर्वी बिल भरून एकूण १ कोटी ५५ लाखांची सवलत मिळविली आहे. दिव्यांगांच्या नावे मिळकत असलेल्यांना सवलतीचा लाभ मागील वर्षी ५९१ जणांनी घेतला. सवलतीची रक्कम १३ लाख आहे. शहरातील एकाही हरित मिळकतीस (ग्रीन बिल्डींग) सूट दिली गेली नाही. मागील सन २०२१- २२ या आर्थिक वर्षांत एकूण २ लाख १ हजार २१६ मिळकतधारकांना एकूण १७ कोटी ८६ लाखांची सवलत पालिकेने दिली आहे. त्यांच्याकडून एकूण २५२ कोटी रुपयांचा करभरणा झाला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.
मालमत्ता कर सवलतीच्या योजना :
चालू सरकारी वर्षाचे चालू मागणीतील देय सामान्य कर रक्कमेवर खालीलप्रमाणे सामान्य कर सवलत योजना अंमलात आहेत.
१. स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे पत्नी यांचे स्वत: रहात असलेल्या फक्त एका निवासी घरास – ५०% सवलत
२. फक्त महिलांचे नाव असलेल्या, स्वत: रहात असलेल्या फक्त एका निवासी घरास -५०% सवलत
३. ४०% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधीर व मूकबधीर यांच्या नावावर असणाऱ्या मालमत्तेस- ५०% सवलत
४. संपूर्ण मालमत्ता कराची रक्कम आगाऊ भरणाऱ्या करीता – स्वतंत्र असलेल्या निवासी मालमत्तेस-१०% सवलत. (बिगरनिवासी/ मिश्र/औद्योगिक / मोकळ्या जमिनी इ. मालमत्तेस – ५% सवलत)
५. ग्रीन बिल्डींग रेटिंग राबविणाऱ्या मालमत्तेस (ग्रीन बिल्डींग CERTIFICATE असणाऱ्या मालमत्तेस) ग्रोहा : २५०० चौ.मी. पेक्षा जास्त भूखंडावरील प्रकल्प 3 STARRATING: ५% सवलत, 4STARRATING: ८% सवलत, ५ STARRATING: १०% सवलत स्वग्रीहा : २५०० चौ.मी.पेक्षा कमी भूखंडावरील प्रकल्प 1 STARRATING: ५% सवलत, 2Star Rating:८% सवलत, 3 STARRATING: १०% सवलत, 4 STARRATING: १२% सवलत, 5 STAR RATING: १५% सवलत.
६. वरील १ ते ५ योजनेपैकी कोणत्याही फक्त एका योजनेचा लाभ मालमत्ताधारकास घेता येईल या सवलतीचा लाभ घेणेकामी थकबाकीसह दोन्ही सहामाहीची संपूर्ण बिलाची रक्कम एक रकमी आगाऊ भरणेची मुदत (बिल मिळो अथवा न मिळो) – ३० जून अखेर.
७. संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवा तसेच अविवाहीत शहीद सैनिकांचे नामनिर्देशितांचे राहणाऱ्या त्याच प्रमाणे शहरात वास्तव्य करणाऱ्या माजी सैनिकांना मालमत्ताकरात (सामान्य कर, मलप्रवाह सुविधा लाभ कर, पाणी पुरवठा लाभ कर, रस्ता करात) १००% सुट.
८. प्रामाणिकपणे दरवर्षी मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना ३ वर्षाचे ब्लॉक नंतर चौथ्या वर्षी – सामान्य करात २ % सवलत संपूर्ण वर्षासाठी .
९. माझी मालमत्ता माझी आकारणी योजना : स्वयंस्फुर्तीने मालमत्ता कराची आकारणी करणाऱ्यांसाठी सामान्य करात २% सवलत संपूर्ण वर्षासाठी.
१०. स्वच्छाग्रह चालू साफ सफाई कराच्या १) ऑन साईट कंपोस्टींग २०%, २) ऑनसाईट कंपोस्टींग + एस टी पी ३०%, ३) झिरोगार्बेज + एसटी पी ५०%
११. थकबाकीसह एक रकमी मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन पेमेंट गेट-वेद्वारे करणाऱ्या मालमत्ताधारकास चालू आर्थिक वर्षाचे सामान्य करात सवलत – माहे जून अखेर – ५% व माहे जुलै ते मार्च अखेर – २ % सवलत.