पिंपरी (Pclive7.com):- पकडलेल्या भंगाराच्या गाडीवर कायदेशीर कारवाई न करता पैसे घेऊन गाडी सोडणाऱ्या ३ पोलीस कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी निलंबित केले आहे. शुक्रवारी (दि.४) रात्री उशीरा तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. हा प्रकार एक महिन्यापूर्वी घडला असून निलंबित तिन्ही पोलीस कर्मचारी हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2022/09/500x500-PMC-News-Banner-Marathi-01-300x300.jpg)
ज्योतिराम झेंडे, विलास बोऱ्हाडे, अशोक घुगे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. एक महिन्यापूर्वी तिघांनी भंगाराची गाडी पकडली होती. या गाडीवर कायदेशीर कारवाई न करता पैसे घेऊन गाडी सोडून दिली होती. पोलिसांनी कारवाई न करता पैसे घेऊन गाडी सोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी तिघांना निलंबित केले. पोलीस आयुक्तांच्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
ज्योतिराम झेंडे, विलास बोऱ्हाडे, अशोक घुगे यांनी गंभीर स्वरुपाच्या गैरवर्तणूक प्रकरणी शिस्तभंग केला आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात येत आहे, असे पोलीस आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.