पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधात विविध राजकीय पक्ष व संघटना यांनी ८ डिसेंबर २०२२ रोजी पिंपरी-चिंचवड शहर बंद पुकारला आहे. याबाबतची घोषणा बहुजन महापुरुष सन्मान समिती यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज सोमवारी केली.
बहुजन महापुरुष सन्मान समिती यांच्या मागण्या..
१) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची ताबडतोब राज्यपाल पदावरून ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी.
२) भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी ताबडतोब देशातील जनतेची माफी मागावी.
३) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करून जनतेची माफी मागावी.
सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले की, या बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, एमआयएम, आम आदमी पार्टी या सारखे राजकीय पक्ष सहभागी असतील. तसेच १०० हून अधिक विविध सामाजिक संघटना जसे संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, छावा सन्घटना, मराठा क्रांती मोर्चा, प्रहार व इतर संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. हे सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटना ८ डिसेंबर रोजीच्या शहर बंद मध्ये सहभागी असतील. हा बंद सकाळी ७ ते सायंकाळी ५ वा पर्यंत असेल. यामध्ये पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन सकाळी १० ते संध्याकाळी ५ वा पर्यंत असेल.
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की, वारंवार बहुजन महापुरुषांचा जसे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केली जात आहेत. ते जाणीवपूर्वक करत आहेत त्यामुळे हा बंद पुकारला आहे. एक वेळेस चूक होते वारंवार चुका होत नाहीत. हा एक षडयंत्राचा भाग आहे.
मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले की, शहरातील औद्योगिक संघटनांशी बोलणे झालेले आहे व व ते सर्व गुरुवारी होणाऱ्या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. बंदमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या सहभागबद्दल विचारले असता चिखले म्हणाले की, मी माजी सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके यांच्याशी बंद बाबत बोललो असताना ते म्हणाले की, पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले की, भाजपचे नेते महेश कुलकर्णी यांच्याशी बोलणे झाले आहे मात्र त्यांच्याकडून अद्याप काही कळवण्यात आलेले नाही.
स्वराज पक्षाचे मानव कांबळे म्हणाले की, बेरोजगारी बेकारी भ्रष्टाचार या प्रश्नांकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांची यंत्रणा काम करत आहे. त्याचाच एका भाग म्हणून बहुजन महापुरुषांची बदनामी करण्यात येत आहे. हाजी गुलजार भाई म्हणाले की, शहरातील सर्व मुस्लिम संघटना या बंदमध्ये सहभागी होतील. शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, बंदमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व रजकीय पक्षांचे अध्यक्ष, प्रतिनिधी व कार्यकर्ते यावेळीस उपस्थित होते.