पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर मनसेचे शहराध्यक्ष तथा माजी गटनेते सचिन चिखले यांचा उद्या सोमवारी (दि १६) रोजी वाढदिवस आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात चिखले यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा होत असतो. परंतु, चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचं नुकतच दुःखद निधन झालं. त्यामुळे यंदा ते आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत, अशी माहिती सचिन चिखले यांनी दिली आहे.
पत्रकात सचिन चिखले यांनी म्हटले आहे की, माझ्या सर्व बंधू, भगिनी व माता आपणास कळवू इच्छितो की, १६ जानेवारी रोजी माझा वाढदिवस असतो. आपण दरवर्षी मोठ्या प्रमाणात येऊन मला शुभेच्छा व आशीर्वाद देता. आपले भरभरून प्रेम मला मिळते. आपल्या शुभेच्छामुळे हा दिवस माझ्या आयुष्यात आनंद निर्माण करणारा व पुढील आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देणारा ठरतो.
परंतू, यावर्षी मी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, आपल्या सर्वांचे आदरणीय लोकप्रिय नेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचं नुकतच निधन झाल आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना भाऊंनी खूप मोठ्या प्रमाणात एक लहान भावाप्रमाणे समजून मला नेहमी चांगली साथ दिली. या शहराच्या जडणघडणीमध्ये आमदार महोदयांचा सिंहाचा वाटा आहे. ते गेल्याने शहर पोरके झाले असून राजकिय पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या सर्वांचा एक हक्काचा माणूस आज आपल्याबरोबर नाही, हे दुःख असह्य होणारे आहे.
त्यामुळे १६ जानेवारी रोजी माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझ्या सर्व मित्र, प्रभागातील नागरिक, राजकीय क्षेत्रातील सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी आपणास नम्र विनंती की, यावेळी आपण कोणीही भेटीसाठी येऊ नये, त्याचप्रमाणे कोणीही केक व पुष्पगुच्छ आणू नये, ही विनंती. आपण सर्वजण आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या कुटुंबातील दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबाला आधार देऊया. हीच सर्वांना नम्र विनंती, असे या पत्रकात चिखले यांनी म्हटले आहे.