पिंपरी (Pclive7.com):- केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (दि.२६) रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी भेट दिली. त्यांनी जगताप कुटुंबाचे सांत्वन केले.
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन राज्यभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी सांत्वन केले. गुरूवारी सायंकाळी केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व त्यांच्या पत्नी कांचनताई गडकरी यांनी जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, लहान बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप व कुटुंबातील इतर सर्व सदस्यांची विचारपूस करत सांत्वन केले. तसेच आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यासोबत राजकारणाच्या माध्यमातून आलेला संपर्काची आठवण करत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.