नवी सांगवी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी बुधवारी (दि.१५) नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात दिवसभर पदयात्रा, गाठीभेटी आणि बैठका घेऊन प्रचारात जोरदार आघाडी घेतली. आज झालेल्या पदयात्रांमध्ये महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी हजेरी लावत एकजुटीचा प्रत्यय आणून दिला. त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात तरी नाना काटे यांनी वातावरण ढवळून काढल्याचे आज दिसून आले. यावेळी विद्यानगर, कृष्णा चौक येथे सभा घेण्यात आली.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज सागर परदेशी जनसंपर्क कार्यालायपासून साई चौक, साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त नवनाथ जगताप यांची भेट, सांगवीचा राजा म्हसोबा मंदिर, फेमस चौक, नवी सांगवी नवसाचा गणपती एम के चौक, शिवनेरी चौक, कृष्णा चौक, साईराज रेसिडेन्सी, बारामती मित्र मंडळ आदी ठिकाणी नागरिक व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. नाना काटे यांच्यासोबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस व आरपीआयसह (गवई गट) इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.
मतदारसंघाच्या विविध भागांमध्ये आज दिवसभरात झालेल्या गाठीभेटी आणि पदयात्रांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी माता-भगिनींकडून नाना काटे यांचे औक्षण केले जात होते. आकर्षक रांगोळ्यांनी मार्ग सजविण्यात आले होते. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून जात होता. विविध गल्ली व रस्त्यांवरून पायी चालत नाना काटे यांनी नागरिकांच्या गाठी-भेटी घेतल्या. मतदारांकडून शुभेच्छांचा स्वीकार करीत नाना काटे यांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली. सर्वसामान्य नागरिक, मतदार आणि माता भगींनींकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रचाराच्या उत्साहात भरच पडत होती. आज दिवसभाराच्या प्रचारादरम्यान ‘राष्ट्रवादी पुन्हा’चीच प्रचिती आल्याने राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे स्पष्ट झाले.
नवी सांगवी, पिंपळे गुरवमध्ये जंगी पदयात्रा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज (दि. १५) प्रभाग क्रमांक ४५, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. सदर यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसामिळाला. पिंपळे गुरव परिसरातील प्रत्येक मतदार आणि घरापर्यंत पोहोचत या पदयात्रेद्वारे काटे यांनी मतदारांना अभिवादन करून मतदान करण्याचे आवाहन केले. पदयात्रेत महाविकास आघाडी प्रचार प्रमुख भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, सामाजिक कार्यकर्ते सागर परदेशी, तानाजी जवळकर, शाम जगताप, राजू लोखंडे, अरुण पवार, सौरभ शिंदे, प्रशांत सपकाळ, प्रशांत देवकाते, पवन साळुंखे, बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब पिल्लेवार, सतीश चोरमुले, राष्ट्रवादी उद्योग आणि व्यापार शहर अध्यक्ष मोनिका जाधव, ऍड श्वेता इंगळे, पिंटू निंबाळकर, साईराज रेसिडेन्सी सोसायटी सभासद, महिला वर्ग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.