पिंपरी (Pclive7.com):- कंपनीच्या नावे परस्पर स्टील खरेदी करून एका व्यापाऱ्याची ३२ लाख ६० हजार १०४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान तळवडे येथे घडला.
या प्रकरणी शरण बसप्पा सिद्धप्पा कुंभार (३९, रा. मारुती लांडगे यांची चाळ, कासारवाडी, पुणे) यांनी गुरुवारी (दि.२) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बंदेनवाज गुरूबादशाह मुलगा (रा. गुलिस्ताननगर, कासारवाडी) बाशीद सय्यद (रा. सुमित कॉम्प्लेक्स, कासारवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी बंदेनवाज याने फिर्यादी यांच्याकडून कागदपत्र घेऊन त्यांच्या स्वामी समर्थ एंटरप्राईजेसचा जीएसटी नंबर तयार केला. त्यानंतर आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्या परस्पर मुंबई येथील अरिहंत कंपनीकडून स्टील खरेदी केले. त्यासाठी स्वामी समर्थ एंटरप्राइजेसच्या नावे बँकेत बनावट खाते उघडले. त्याचे चेक अरिहंत स्टील, मुंबई यांना देऊन ३२ लाख ६० हजार १०४ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास चिखली पोलिस करीत आहेत.