पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक शांततेत पार पाडावी म्हणून पोलिसांनी सराईत गुन्हेगार तसेच टोळ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने काल (दि.०४) रोजी पिंपरीत देखील पोलिसांचा रूट मार्च घेण्यात आला.
पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत हा रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च सकाळच्या सत्रात साडेनऊ ते बारा व दुपारच्या सत्रात सायंकाळी पाच ते सात या दरम्यान घेण्यात आला. दोन्ही वेळेस सुमारे चार किलोमीटरचे अंतर होते. रूट मार्च हा संवेदनशील झोपडपट्टी व पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीतील महत्त्वाचे ठिकाणे, बाजारपेठ एरिया येथे घेण्यात आला.
सदर रूट मार्च हा पोलीस उपायुक्त (परिमंडळ 1) स्वप्ना गोरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. यावेळी सचिन हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग व पिंपरी पोलीस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी तसेच केंद्रीय दलाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.