पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध समित्या आणि मंडळाच्या माजी सदस्यांसह माजी लोकप्रतिनिधींचे निवासस्थान, संपर्क कार्यालय यांची माहिती देणारे फलक आणि त्यांचे नामफलकही शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. या माजी सदस्य आणि माजी लोकप्रतिनिधींकडून कार्यकाळ संपल्यानंतरही केवळ सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी असे फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात येत आहेत. असे नामफलक हटविण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे याबाबत अमोल थोरात यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने आहेत. महापालिकेच्या विविध समित्या आणि मंडळांच्या सदस्यांचाही यात समावेश आहे. अशा सदस्य आणि लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांचे निवासस्थान दर्शविणारे आणि अन्य ठिकाणचे नामफलक कायम राहतात. यात माजी लोकप्रतिनिधींची संख्या अधिक आहे. माजी लोकप्रतिनिधीही आपले नामफलक जागोजागी लावत असल्याचे दिसून येते.शहरातील मुख्य चौकांसह गल्लीबोळांतील चौकांत आणि अंतर्गत रस्त्यांवरही असे फलक मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामुळे चौक आणि रस्त्यांच्या सौंदर्यास बाधा निर्माण होत आहे. चौक आणि रस्त्यांचे विद्रुपिकरणही झाल्याचे यातून दिसून येते.
बहुतांश माजी लोकप्रतिनिधी आणि माजी सदस्य त्यांच्या नामफलकावर माजी असे लिहीत नाहीत किंवा केवळ ‘मा.’ असे लिहितात. असे करू माजी लोकप्रतिनिधी आणि सदस्य स्वत:च्या पदाबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण करतात. पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही आपण अजूनही त्याच पदावर कार्यरत आहोत, असे भासविण्याचा केविलवाणा प्रयत्न यातून करण्यात येतो. यातून केवळ सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यात येत आहे.सर्वसामान्यांच्या अज्ञानाचा यातून गैरफायदा घेण्यात येत आहे. काही माजी लोकप्रतिनिधी आणि सदस्य केवळ प्रतिष्ठा किंवा मिरवण्यापुरता किंवा दहशत निर्माण करण्यासाठीही असे नामफलक जागोजागी लावतात. हा प्रकार हास्यास्पद तितकाच गंभीरही आहे.
सर्वसामान्यांची दिशाभूल न होता आणि फसवणूक टाळण्यासाठी अशा माजी सदस्य आणि लोकप्रतिनिधींचे नामफलक हटविणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यमान लोकप्रतिनिधी आणि माजी लोकप्रतिनिधी यांच्याबाबत गल्लत न होता सर्वसामान्यांची अडचण दूर होईल. आपला कार्यकाळ संपल्यानंतरही त्या ‘पदा’चा लाभ उठविण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही माजी सदस्य आणि लोकप्रतिनिधींना यातून आळा बसविणे शक्य होईल; तसेच संबंधित ‘पदा’चा सन्मानही राखला जाईल. त्यासाठी महापालिका प्रशासनाने अशा फलकांवर कारवाई करावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी या निवेदनातून केली आहे.