पिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना स्वच्छतेसाठी हातमोजे आणि मास्कचे वाटप करण्यात आले. दोनशे कर्मचा-यांना मास्क आणि हातमोजे देण्यात आले.
पिंपरी, नेहरुनगर येथे आज (शनिवारी) स्वच्छता करणा-या कर्मचा-यांना हातमोजे आणि मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षा वर्षा पांगारे, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य आरोग्य निरीक्षक रमेश भोसले, रोटरीच्या सचिव नीता अरोरा, प्रकल्प अधिकारी राम भोसले, महादेव शेंडकर, रो. राजेंद्र भोसले, रो. भाऊसाहेब पांगारे, सुशिल अरोरा, रो. सदाशिव काळे, रो. अनिल शर्मा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रोटरीच्या अध्यक्षा वर्षा पांगारे म्हणाल्या, स्वच्छता कर्मचा-यांमुळे आपले शहर स्वच्छ आणि सुंदर आहे. त्यांचा आणि त्यांच्या कामाचा आपण नेहमीच आदर केला पाहिजे. त्यांच्याकडे स्वच्छता करणारे कर्मचारी या भावनेने न पाहता ‘स्वछतादूत’ म्हणून पाहावे. स्वच्छतेसारखे पवित्र कार्य दुसरे कोणतेही नाही.
दरम्यान, रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे येत्या २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा आरोग्य कर्मचा-यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन, रोटरी क्लबचे प्रकल्प अधिकारी राम भोसले यांनी केले.