पिंपरी (Pclive7.com):- दापोडी येथील बुध्द विहाराजवळ असलेल्या धोंडीबा काटेनगर भागात ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रत्येक घरासमोर पाणीच पाणी झाल्याचे दिसत आहे. या परिसरातील जयभीमनगर येथेही असाच प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.
दापोडी येथील बुध्द विहाराजवळ धोंडीबा काटेनगर आहे. सुमारे ५ हजार लोकवस्तीचा हा परिसर आहे. गेल्या ५ ते ६ वर्षापासून या भागात ड्रेनेजची मोठी समस्या आहे. वारंवार ड्रेनेजचे घाण पाणी येथील नागरिकांच्या घरात शिरत आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरल्यामुळे साथीचे आजार देखील वाढत आहेत.
राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक रोहित काटे यांनी याबाबत अनेकदा महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. बजेट नाही, ठेकेदार करण्यास तयार होत नसल्याचे संबंधित अधिकारी सांगतात. लवकरात लवकर संबंधित विभागाने या समस्येबाबत उपाययोजना न केल्यास उपोषणाला बसणार असल्याचा इशारा नगरसेवक रोहित काटे यांनी दिला आहे.