महापालिका प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- जलपर्णीमुक्त इंद्रायणी, पवना हा संकल्प महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, प्रतिवर्षी जलपर्णीचे संकट ‘जैसे थे’ च्या अवस्थेत आहे. विशेष म्हणजे, जूनअखेर नदीपात्र चकाचक दिसत असताना संततधार पावसामुळे पुन्हा जलपर्णी पाण्याबरोबर वाहून आली आहे. परिणामी, महापालिका प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. तरी महापालिका प्रशासनाने ही जलपर्णी हटवण्यासाठी तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी सामाजिक संस्था तसेच नागरिक करत आहेत.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230713-WA0023-300x150.jpg)
शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीचे पात्र २४ किलोमीटर, इंद्रायणीचे १९ आणि मुळा नदीचे १० किलोमीटर पात्र महापालिका हद्दीतून वाहते आहे. या तीन नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी शहरातील नद्यांची सहा पॅकेजमध्ये विभागणी करून जलपर्णी काढण्याचे कामकाज ठेकेदारांना देण्यात आले. या कामाची मुदत जून- २०२३ रोजी संपली आहे. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे मावळात संततधार सुरू आहे. परिणामी, नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे मावळ आणि परिसरातून वाहून आलेली जलपणी तळवडे, चिखली, रावेत येथील पात्रात साचली आहे. त्यामुळे जलपर्णीचा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.
पर्यावरण प्रेमींची नाराजी…
जलपर्णी काढण्यासाठी संबंधित ठेकेदारांना सहा महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत जून-२०२३ मध्ये संपली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जलपर्णी हटवण्यात आली होती. मात्र, मुदत संपल्यामुळे संबंधित ठेकेदारांनी काम थांबवले. पावसाळा सुरू झाल्यानंतर महापालिका हद्दीलगतच्या भागातील जलपर्णी पावसासोबत वाहून आली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून प्रशासनाच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे, संबंधित ठेकेदारांची कामाची मुदत संपल्यामुळे प्रशासनाची ‘तांत्रिक कोंडी’ झाली आहे.
प्रशासनासमोर नवा पेच..
संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, लक्षात आले की, जलपर्णी काढण्याबाबत ६ महिन्यांसाठी काम ठेकेदारी पद्धतीने दिले होते. त्यामध्ये संबंधित ठेकेदाराने जलपर्णी काढल्याचे जीपीएस- लोकेशन आणि फोटो प्रशासनासकडे जमा केले आहेत. प्रशासनानेही त्याची शहानिशा केली आहे. कामाची मुदत संपल्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.