पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. त्याठिकाणी होत असलेल्या ब्लास्टिंगची डेन्सिटी कमी करावी अशा मागणीचे निवेदन भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहे.
अमित गोरखे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड येथील ऑटो क्लस्टरच्या समोरील जमिनीवर सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन इमारतीचे खोदकाम चालू आहे. या खोदकामात वापरल्या जाणाऱ्या ब्लास्टिंगमुळे शेजारील एम्पायर स्क्वेअर या इमारतीच्या रहिवाशांना त्रास होत असून या ब्लास्टिंगच्या हेवी डेन्सिटीमुळे इमारतीला तडे बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लास्टिंगमुळे काही काचा तुटण्याचा प्रकार नुकताच घडला. तसेच सकाळी लवकर काम चालू होऊन रात्री उशिरापर्यंत चालत असल्याने त्या आवाजाचा त्रासही या इमारतीधारकांना होत आहे.
एम्पायर स्क्वेअर समितीच्या वतीने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले. याविषयी आयुक्तांनी त्वरित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन चर्चा करून आदेश दिले आहेत. यावेळी अमित गोरखे यांच्या सोबत एम्पायर स्क्वेअर सोसायटीतील, विनीत कदम, तुषार शिंदे, संजय साळुंखे, विजय गुप्ता, झिशान खान, केतन पारख, श्री. जगताप, श्री मेहता उपस्थित होते.